"IAS नव्हतं बनायचं पण...", UPSC परिक्षेत टॉप-५ मध्ये आलेला एकमेव मुलगा कोण आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 05:02 PM2023-05-24T17:02:22+5:302023-05-24T17:06:57+5:30

UPSC Result 2022 : नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये टॉप-५ मध्ये केवळ एका मुलाला स्थान पटकावता आले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर केला. दिल्लीच्या इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक पटकावला, तर ठाण्याच्या कश्मिरा संखे हिने राज्यात पहिला क्रमांक मिळवला.

टॉप-४ मध्ये मुलींचा दबदबा पाहायला मिळाला, तर पाचव्या क्रमांकावर मुलाने बाजी मारली. यूपीएससी २०२२ ची टॉपर इशिता किशोर ठरली. तर गरिमा लोहिया, उमा हर्ती आणि स्मृती मिश्रा अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

आसामच्या मयुर हजारिकाने पाचवे स्थान पटकावले. तो पुरूषांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. आसामच्या तेजपूर येथील रहिवासी असलेला मयुर सुरूवातीपासूनच टॉपर राहिला आहे.

मयुर पेशाने एक डॉक्टर आहे, त्याने गुवाहाटी मेडिकल कॉलेज येथून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. मयुरने या यशानंतर सांगितले की, त्याने परिक्षेची जोरदार तयारी केली होती पण एवढं मोठं यश मिळेल याची कल्पना नव्हती.

मयुरचे अभिनंदन करताना आसामचे मुख्यमंत्री यांनी ट्विट करत म्हटले, "पाचवी रॅंक मिळाल्याबद्दल मयुरचे खूप अभिनंदन. त्याचं हे यश युवकांना प्रेरणा देईल."

मयुरने माध्यमांशी संवाद साधताना निकालावर आनंद व्यक्त केला. तसेच त्यानं सांगितलं की. भारतीय परराष्ट्र सेवेत (IFS) काम करण्याची माझी इच्छा होती, जी आता पूर्ण होईल.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२२ च्या परिक्षेचा निकाल जाहीर केला असून ९३३ विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. टॉप-४ मध्ये महिलांचा समावेश आहे तर पाचव्या क्रमांकवर मयुर हजारिका आहे.