'हे कसं काय शक्य आहे?; सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला सवाल, सरन्यायाधीशांनी सुनावलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 01:15 PM2022-08-03T13:15:55+5:302022-08-03T13:21:29+5:30

शिंदे गटाकडून अपात्रतेचा मुद्दा विधानसक्षा अध्यक्षांकडे सोपवला जावा असा युक्तिवाद केला.

राज्यातील शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी सुप्रिम कोर्टात सुरू आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. तर शिंदे गटाकडून हरिश साळवे आणि नीरज कौल युक्तिवाद करत आहे.

आपला नेता भेटत नाही म्हणून नवा पक्ष स्थापन करु शकतो का? अशी विचारणा सरन्यायाधीशांनी केली. यावर हरिश साळवे यांनी बंडखोर आमदार पक्षातच आहेत असं सांगितलं. यावर सरन्यायाधीशांनी तुम्ही सध्या कोण आहात? असं विचारलं असता आम्ही पक्षातील नाराज सदस्य असल्याचं सांगण्यात आलं. तसेच भारतामध्ये आपण अनेकदा काही नेते, व्यक्ती म्हणजेच पक्ष समजण्याची चूक करतो. जर पक्षातील काही लोकांना मुख्यमंत्री बदलावा असं वाटत असेल तर ही पक्षविरोधी नाही. हा पक्षांतर्गत मुद्दा आहे असं हरिश साळवे यांनी स्पष्ट केलं.

शिंदे गटाकडून अपात्रतेचा मुद्दा विधानसक्षा अध्यक्षांकडे सोपवला जावा असा युक्तिवाद केला. ज्या अध्यक्षांना बहुमताने निवडून आणलं आहे, त्यांना निर्णय घेण्यापासून रोखणं, अधिकार काढून घेणं घटनाबाह्य ठरेल. कोर्टाने त्यात ढवळाढवळ करु नये असा युक्तिवाद हरिश साळवे यांनी केला आहे.

शिंदे गटाच्या या युक्तिवादावर सरन्यायाधीशांनी तुम्ही न्यायालयात प्रथम आल्यानंतर १० दिवसांचा वेळ दिला, त्याचा थोडा फायदाही तुम्हाला झाला आणि आता मध्यस्थी करु नका सांगत आहात, हे कसं काय शक्य आहे?, आम्ही तुम्हाला दिलासा दिला आणि आता आम्ही निर्णय घेऊ शकत नाही, असं तुम्ही कसं सांगू शकता? अशी विचारणा न्यायालयाने केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रश्नावर काही गंभीर विषय असल्याने तातडीने आम्हाला सर्वोच्च कोर्टात यावं लागलं होतं यावर शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करणारे वकील नीरज कौल यांनी सांगितलं. यावर सरन्यायाधीशांनी आम्ही कर्नाटकमधील निकालाचा मुद्दा बाजूला ठेवून हायकोर्टात दाद मागण्यास न सांगता तातडीने तुमची याचिका ऐकल्याचं सांगितलं. काही मुद्द्यांचा सोक्षमोक्ष लावणं गरजेचं असल्याचं न्यायालने म्हटलं आहे.

शिंदे गटाचं दुसऱ्या पक्षात विलीनीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरेंच्या बाजूनं करण्यात आला. तुम्ही दोन तृतीयांश असला तरी मूळ पक्षावर दावा करू शकत नाही. दोन तृतीयांश पक्ष असलेल्या दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकता. दोन तृतीयांश लोक दुसर्‍या पक्षात विलीन होणे किंवा नवीन पक्ष स्थापन करणे हा एकमेव मार्ग आहे, असं उद्धव ठाकरेंच्या बाजूनं कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.