निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 07:00 AM2024-05-22T07:00:04+5:302024-05-22T07:00:42+5:30

मुंबई जिल्हाधिकारी व मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या दिवशी म्हणजे ४ जून रोजी संपूर्ण दिवस ‘ड्राय डे’ ठेवण्याच्या निर्णयाला हॉटेल्स ओनर्स असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Opposition to 'Dry Day' on Judgment Day; Petition of Hotel Owners Association in High Court | निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका

प्रतिकात्मक फोटो...

मुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत कोणी जिंको अथवा हरो मात्र, तळीरामांना तो आनंद किंवा दु:ख साजरे करण्याची संधी मिळावी, त्यांची ‘सोय’ व्हावी, यासाठी ४ जूनच्या ‘ड्राय डे’ला हॉटेल्स ओनर्स असोसिएशनचा विरोध आहे. मुंबई जिल्हाधिकारी व मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या दिवशी म्हणजे ४ जून रोजी संपूर्ण दिवस ‘ड्राय डे’ ठेवण्याच्या निर्णयाला हॉटेल्स ओनर्स असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

‘ड्राय डे’च्या दिवशी हॉटेल, रेस्टॉरंट्स, वाईन शॉपमध्ये दारू विक्री करण्यास मनाई करण्यात येते. त्याविरोधात इंडियन हॉटेल ॲंड रेस्टॉरंट असोसिएशन (आहार) यांनी दोन वेगवेगळ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. ४ जूनच्या दिवशी दुपारीच मतमोजणी संपेल. त्यामुळे संपूर्ण दिवस मद्यविक्रीस बंदी घालण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय मनमानी आहे, असे ‘आहार’ने याचिकेत म्हटले आहे. बुधवारी या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.  

या निर्णयावर फेरविचार करण्यात यावा, यासाठी मुंबई  जिल्हाधिकारी व उपनगर जिल्हाधिकाऱ्यांपुढे निवेदन सादर केले. मात्र, हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार घेण्यात आल्याने मागे घेणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, असे याचिकेत म्हटले आहे.

बेकायदा दारूचे काय?
- असोसिएशनचे सदस्य फार मोठी रक्कम परवाना शुल्क म्हणून सरकारकडे जमा करते. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये मद्यविक्री बंद केली, तरी बेकायदा मद्याचे उत्पादन करणारी अनेक उत्पादक आहेत.
- अशा दिवसांचा फायदा घेऊन ते बेकायदा भलामोठा नफा कमावतात. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस ‘ड्राय डे’ ठेवण्याऐवजी मतमोजणी होईपर्यंतच ‘ड्राय डे’ जाहीर करावा. 
- तशी आदेशात सुधारणा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
 

Web Title: Opposition to 'Dry Day' on Judgment Day; Petition of Hotel Owners Association in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.