ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:50 IST2026-01-01T15:36:04+5:302026-01-01T15:50:07+5:30

Indian Railway First Sleeper Vande Bharat Train Launch Date: पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार? तिकीट किती असणार? A To Z माहिती जाणून घ्या...

Indian Railway First Sleeper Vande Bharat Train Launch Date: अवघे भारतीय प्रवासी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आला आहे. भारताची पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेनची प्रवासी सेवेत येण्याची तारीख ठरली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण केले जाणार आहे.

आताच्या घडीला स्लीपर वंदे भारत या ट्रेनचे कधी लोकार्पण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्लीपर वंदे भारतचे दोन प्रोटोटाइप तयार करण्यात आले असून, यापैकी पहिल्या प्रोटोटाइप मॉडेलची ट्रायल देशभरात सुरू आहे.

पहिल्या प्रोटोटाइप व्हर्जनच्या दोन स्लीपर वंदे भारत ट्रेन तयार आहेत. दोन्ही स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या ट्रायल रन देशभरात सुरू आहेत. देशातील विविध भागात या स्लीपर वंदे भारत ट्रेनची चाचणी सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्लीपर वंदे भारत ट्रेनची फक्त चाचणीच सुरू असल्याचे पाहायला मिळत होते. परंतु, ही ट्रेन प्रवासी सेवेत कधी येणार, हे नक्की होत नव्हते. परंतु, आता पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचा मार्ग, तिकीट दर या सगळ्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. ही ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान धावेल, अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. पुढील १५-२० दिवसांत १८ जानेवारी किंवा १९ जानेवारी रोजी ही ट्रेन सुरू होण्याची अपेक्षा आहे.

नवीन ट्रेनची चाचणी आणि प्रमाणन पूर्ण झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत नेमकी तारीख जाहीर केली जाणार आहे. वैष्णव यांनी नवीन ट्रेनच्या वैशिष्ट्यांवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की, स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये प्रगत सुरक्षा प्रणाली, सुधारित सस्पेंशन, एनर्जी एफिशिएंट आणि अधिक एरोडायनामिक डिझाइन आहे. आरामदायी आणि विश्वासार्ह लांब पल्ल्याच्या प्रवासाची खात्री करण्यासाठी प्रवाशांच्या सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत.

ही एक मोठी उपलब्धी आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा, सुरक्षितता आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देईल, विशेषतः लांब रात्रीच्या प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत ट्रेन विशेष ठरणारी आहे. ही ट्रेन प्रादेशिक आदरातिथ्याचा विचार करेल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

स्लीपर वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर समोर आले आहेत. 3rd AC श्रेणीचे दर जेवणासह सुमारे ₹२,३०० असेल. 2nd AC श्रेणीचे दर सुमारे ₹३,००० आणि 1st AC श्रेणीचे दर सुमारे ₹३,६०० असण्याची अपेक्षा आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, स्लीपर वंदे भारत ट्रेनचे दर विमानाच्या दरांपेक्षा खूपच कमी ठेवण्यात आले आहे. गुवाहाटी ते हावडा विमान भाडे ₹६,००० ते ₹८,००० दरम्यान आहे. वंदे भारतमध्ये जेवणासह थर्ड एसीचे दर सुमारे ₹२,३००, सेकंड एसीचे सुमारे ₹३,००० आणि फर्स्ट एसीचे सुमारे ₹३,६०० असेल. हे दर सामान्य माणसाला लक्षात घेऊन निश्चित करण्यात आले आहे.

स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये सुरक्षेसाठी ‘कवच’ प्रणाली, बायो-वॅक्यूम टॉयलेट्स, नाईट-लायटिंग, सीसीटीव्ही, ऑटो-डोअर्स सुविधा ट्रेनमध्ये देण्यात आल्या आहेत. तसेच अपंग प्रवाशांसाठी विशेष टॉयलेट, बेबी केअर एरिया, शॉवर सुविधा (फर्स्ट क्लासमध्ये गरम पाण्यासह), पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, प्रत्येक कोचमध्ये वाचन दिवे, चार्जिंग पॉइंट्स, फोल्डेबल स्नॅक टेबल्स, जीएपआरपी इंटिरिअर पॅनल्स बसवले आहेत.

वंदे भारत स्लीपर ही एक सेमी-हाय-स्पीड ट्रेन आहे ज्यामध्ये एकूण १६ कोच आहेत, ज्यामध्ये ११ थर्ड एसी, ४ सेकंड एसी आणि १ फर्स्ट एसी कोच आहे. थर्ड एसीमध्ये ६११ बर्थ, १८८ सेकंड एसी आणि २४ फर्स्ट एसी बर्थ आहेत. ही ट्रेन एकूण ८२३ प्रवाशांना घेऊन जाईल. तिचा वेग ताशी १८० किलोमीटरपर्यंत आहे.

एखाद्या विमानासारख्या सेवा या स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. डिझाइन केलेल्या बर्थमध्ये लांब प्रवास कमी थकवणारा असेल. स्वयंचलित दरवाजे आणि वेस्टिब्युल्स (कनेक्ट केलेले कॉरिडॉर) डब्यांमधील हालचाल सुलभ करतात, ज्यामुळे प्रवास करतानाही प्रवाशांना सहज दोन कोचमधून ये-जा करता येणे शक्य होते.

स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये अत्याधुनिक सस्पेंशन सिस्टम आहे, ज्यामुळे आवाज लक्षणीयरीत्या कमी होऊन शांत आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित होतो. कवच अँटी-कलिजन सिस्टम आणि आपत्कालीन टॉक-बॅक सिस्टम आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सहज मदत प्रदान करतात.

जंतुनाशक तंत्रज्ञानामुळे डबे नेहमीच स्वच्छ आणि जंतूमुक्त असतात, याची खात्री होते. आधुनिक नियंत्रण पॅनेल आणि सुरक्षा प्रणालींसह लोको पायलटसाठी अतिशय अत्याधुनिक आणि प्रगत केबिन डिझाइन करण्यात आली आहे.

एरोडायनामिक डिझाइनमुळे ट्रेन उच्च वेगाने स्थिर राहते. स्वयंचलित दरवाजे असल्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता कायम राहते. रेल्वेमंत्र्यांनी घोषणा केली की, पुढील सहा महिन्यांत आणखी ८ वंदे भारत स्लीपर ट्रेन येतील, तर वर्षभरात एकूण १२ ट्रेन सुरू केल्या जातील.

इतर ट्रेन तुलनेत अनेक प्रगत आणि अद्वितीय वैशिष्ट्यांसह वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. भारतीय रेल्वे २०० हून अधिक वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा रोडमॅप तयार करत आहे.