...तर देशातील महत्त्वाची शहरं पाण्याखाली जाणार; WMOच्या अहवालानं चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 04:53 PM2021-11-12T16:53:58+5:302021-11-12T16:56:35+5:30

वाढत्या हवामान बदलाचा फटका कोट्यवधी लोकांना बसणार

देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. भारताच्या दक्षिण, पूर्वेला असणाऱ्या हिंदी महासागर आणि त्याच्या शेजारी असलेल्या पॅसिफिक महासागराचं तापमान जगातील इतर समुद्रांच्या तुलनेत वेगानं वाढ होत आहे.

भारताच्या दक्षिण, पूर्वेला असणाऱ्या हिंदी महासागर आणि त्याच्या शेजारी असलेल्या पॅसिफिक महासागराचं तापमान जगातील अन्य समुद्रांच्या तुलनेत तिपटीनं वाढत आहे. त्यामुळे भारताच्या दक्षिण-पूर्व किनारपट्टीला, दक्षिण-पूर्व आशिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलियासह अनेक भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

जागतिक हवामान विज्ञान संस्थेनं (डब्ल्यूएमओ) जागतिक तापमान वाढीसंदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे. दक्षिण-पश्चिम पॅसिफिक महासागर, दक्षिण-पूर्व हिंदी महासागर आणि ऑस्ट्रेलियाच्या खालील भागात असलेल्या समुद्राचं तापमान वेगानं वाढत असल्याचं डब्ल्यूएमओचा अहवाल सांगतो.

समुद्रातील उष्णता वाढत असल्याचा परिणाम प्रवाळांना होत आहे. दक्षिण पूर्व आशिया आणि पॅसिफिक महासागरातील लहान बेटांवर पुराचा, वादळांचा फटका बसू लागला आहे. यामध्ये मोठी जीवितहानी होत आहे. वित्तीय हानीचं प्रमाणही जास्त आहे.

तापमान वाढल्यानं ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये वणवा पेटण्याचं प्रमाण वाढलं आहे. येत्या ५ वर्षांत हिमालय आणि अँडीज पर्वतांमधील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळेल, अशी भीती आहे. समुद्रातील पाणी पातळी वाढल्याचा सर्वाधिक फटका ब्रुनेई, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पॅसिफिकमधील बेटांना बसेल.

जमीन आणि समुद्राच्या तापमानात सरासरी २ डिग्रीनं वाढ होण्याआधी देशांनी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे. हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर असलेले भारतातील प्रदेश, आग्नेय आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियाच्या आसपास असणारा भाग समुद्रातील हवामानावर अवलंबून आहे. समुद्राचं तापमान, ऑक्सिजनचा स्तर आणि समु्द्रातील पाणी पातळी वाढल्यास किनाऱ्यांवरील देशांचं किती मोठं नुकसान होईल याची माहिती डब्ल्यूएमओच्या अहवालात आहे.

समुद्रातील वातावरण बदलल्यास, पाणी पातळी वाढल्यास किनारी भागांमधील मत्स्योत्पादन, पर्यटन धोक्यात येईल. समुद्रातील वाढत्या उष्णतेमुळे चक्रीवादळांचं प्रमाण वाढतं. याचा मोठा फटका किनाऱ्यांवरील भागांना आणि तिथल्या निसर्गाला बसतो.

गेल्या काही महिन्यांपासून भारतातील नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढत आहे. अनेक राज्यांना पुराचा तडाखा बसला आहे. मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट आहे. भूस्खलनाच्या घटना वाढत आहेत. मुसळधार पावसाचा फटका कोट्यवधीं लोकांना बसत आहे. चक्रीवादळांचं प्रमाण वाढलं आहे.