किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 08:21 AM2024-05-07T08:21:41+5:302024-05-07T08:21:57+5:30

एखादा डाग किंवा एखादा व्रण असला तरी ती मुलगी नाकारली जाते. या सगळ्या चाळणीतून ज्या मुली उरतात त्या किम जोंग उनच्या  खासगी ‘प्लेझर स्क्वॉड’मध्ये रुजू करून घेतल्या जातात.

25 young women for Kim Jong un's 'Pleasure Squad'; one girls was selected twice, but... | किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

फार वर्षांपूर्वी एक दुष्ट राजा होता. त्याच्या राज्यातील सगळ्या तरुण व सुंदर मुलींवर त्याची वाईट नजर असायची. राजासाठी नवनवीन तरुण आणि सुंदर मुलींचा शोध घेण्यासाठी राजाचे काही सैनिक सतत त्याच्या राज्यात फिरत असत. आपली सुंदर मुलगी त्या सैनिकांच्या नजरेस पडू नये यासाठी मुलींच्या आईवडिलांचा अक्षरशः जीव गोळा व्हायचा. कारण राजाने पकडून नेलेल्या या मुलींचं पुढे काय होई ते सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नसे. पण ज्यांची मुलगी सुंदर असेल त्यांना राज्य सोडूनही जाता यायचं नाही, कारण राज्य सोडून पळून जाताना पकडले गेलात तर मृत्युदंड ठरलेलाच असायचा. मात्र तरीही एक शूर मुलगी एकदा या जुलमी राजाच्या राज्यातून पळाली...

ही गोष्ट वाचताना कोणालाही वाटेल की ही एक तर फार फार जुनी गोष्ट असेल किंवा मग पूर्णतः कपोलकल्पित. पण तसं नाही. ही पूर्णतः खरी गोष्ट आहे आणि तीही आत्ताच्या काळातली. त्या राज्याचं नाव आहे उत्तर कोरिया, राजाचं नाव आहे किम जोंग उन आणि त्या पळून आलेल्या मुलीचं नाव आहे येओनमी पार्क.
उत्तर कोरिया हा देश आणि तिथला किम जोंग उन नावाचा हुकूमशहा यांच्याबद्दल कायमच काही ना काही ऐकायला येत असतं. पण या येओनमी पार्क नावाच्या मुलीने केलेला दावा आजवरच्या सगळ्या चमत्कारिकपणावर कडी करणारा आहे. येओनमीच्या सांगण्यानुसार, उत्तर कोरिया या देशाचा हुकूमशहा किम जोंग उन हा दरवर्षी त्याच्या वैयक्तिक ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ मुली निवडतो. या मुली निवडण्यासाठी त्याचे सैनिक देशभर हिंडत असतात. ते प्रत्येक शाळेत जातात. प्रत्येक मैदानावर जातात. घरोघरी जातात. कारण देशातली कुठलीही सुंदर मुलगी नजरेतून सुटायला नको ! अशा पद्धतीने अक्षरशः संपूर्ण देश विंचरून काढल्यानंतर त्यांना ज्या सुंदर मुली सापडतात त्यांच्या कुटुंबाचा इतिहास तपासला जातो. ज्या मुलीच्या घरातील एखादी व्यक्ती उत्तर कोरियातून पळून गेलेली असेल किंवा एखादीचे नातेवाईक दक्षिण कोरियात राहत असतील तर त्या मुलीची निवड केली जात नाही. त्यानंतर त्या मुलींची संपूर्ण शारीरिक तपासणी केली जाते. एखादा डाग किंवा एखादा व्रण असला तरी ती मुलगी नाकारली जाते. या सगळ्या चाळणीतून ज्या मुली उरतात त्या किम जोंग उनच्या  खासगी ‘प्लेझर स्क्वॉड’मध्ये रुजू करून घेतल्या जातात.

या मुलींमध्येही सगळ्यात जास्त सुंदर मुली किम जोंग उनसाठी तर बाकी मुली उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या करमणुकीसाठी ठेवल्या जातात. अर्थातच, या सगळ्या मुलींची कौमार्य चाचणी सगळ्यात आधी केली जाते. या मुलींच्या पथकाचे तीन भाग केले जातात. त्यातील एका भागातील मुलींना मसाज करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. दुसऱ्या गटाला नाच-गाण्याचं प्रशिक्षण दिलं जातं, तर तिसऱ्या गटातील मुलींना सत्ताधारी पुरुषांच्या लैंगिक इच्छा पूर्ण करणं हे एकमेव काम असतं. त्यासाठीचं प्रशिक्षणही त्यांना दिलं जातं. उत्तर कोरियाचा हुकूमशहा आणि इतर सत्ताधारी पुरुषांना खुश ठेवणं हे त्यांच्या आयुष्याचं एकमेव ध्येय असतं.

या मुलींची स्क्वॉडमध्ये निवड झाल्यापासून त्यांचा कार्यकाळ सुरू होतो आणि त्या साधारण पंचविशीच्या झाल्या की संपतो. या स्क्वॉडमधून निवृत्त झालेल्या स्त्रियांचं अनेकदा किम जोंग उनच्या शरीररक्षकांशी लग्न लावून दिलं जातं. किम जोंग यांच्या पत्नीची निवडही याच ‘प्लेझर स्क्वॉड’मधून करण्यात आली आहे. ‘प्लेझर स्क्वॉड’ या प्रकारचा उदय उत्तर कोरियात १९७० च्या सुमारास झाला. त्यावेळी किम जोंग उन यांचे वडील किम जोंग दुसरे हे उत्तर कोरियाचे हुकूमशहा होते. त्यांची अशी कल्पना होती की तरुण, कुमारी मुलींशी संबंध ठेवल्यानं दीर्घायुष्य मिळतं. त्यामुळे मृत्यूला चकवण्यासाठी त्यांनी प्लेझर स्क्वॉडची सुरुवात केली. मात्र २०११ साली वयाच्या ७० व्या वर्षी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. किम जोंग उन दुसरे आणि त्यांच्या अमरत्वाबद्दलच्या कल्पना जरी भूतकाळात जमा झालेल्या असल्या तरी किम जोंग उन यांनी स्त्रियांचं असं पथक स्वतःच्या दिमतीला ठेवण्याची परंपरा मात्र सुरू ठेवलेली आहे.

तिची दोनदा निवड झाली, पण..
एरवी ज्या उत्तर कोरियात प्रत्येक गोष्ट गुप्त असते त्या देशात असं काही तरी चालतं हे येओनमी पार्क या सर्वसामान्य युवतीला कसं समजलं? तर तिची स्वतःची दोन वेळा या प्लेझर स्क्वॉडसाठी निवड झाली होती. मात्र तिच्या कौटुंबिक स्थानामुळे ती अंतिम २५ जणींमध्ये निवडली गेली नाही, असा तिचा दावा आहे. एखाद्या माणसाला अमर्याद सत्ता मिळाली तर त्याचं किती अधःपतन होऊ शकतं याचं किम जोंग उन हे उदाहरण आणि प्लेझर स्क्वॉड ही त्याची परिसीमा!

Web Title: 25 young women for Kim Jong un's 'Pleasure Squad'; one girls was selected twice, but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.