गावात आलिशान बंगला, स्विमिंग पूल अन् बऱ्याच महागड्या गाड्या; महिला सरपंचाची डोळे दिपवून टाकणारी संपत्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 02:57 PM2021-09-01T14:57:31+5:302021-09-01T15:02:14+5:30

मध्य प्रदेशातील एका सरपंचाची कोट्यवधींची संपत्ती उघड झाली आहे. समोर आलेली माहिती ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. पाहा...

मध्य प्रदेशच्या रीवामध्ये लोकायुक्तानं एका महिला सरपंचाची कोट्यवधींची संपत्ती उघडकीस आणली आहे. या सरपंचाचा गावात आलिशान बंगला असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय डजनभर महागड्या गाड्या आणि काहीशे एकर जमिनीची नोंदणी असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी महिला सरपंचावर कारवाई करत आतापर्यंत १९ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

रीवा जिल्ह्यातील हुजूर तहसीलमध्ये बैजनाथ गावातलं हे प्रकरण आहे. लोकायुक्तांच्या पथकानं याठिकाणी महिला सरपंच सुधा सिंह यांच्या घरी छापा टाकले आहे.

यात महिला सरपंचाच्या नावावर आलीशान बंगला, कोट्यवधी किमतीची डजनभर वाहनं, दागदागिने, जमीन, जेसीबी अशी मालमत्ता असल्याचं उघडकीस आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास १९ कोटी रुपयांची मालमत्ता समोर आली आहे. सुधा सिंह यांनी एक एकर परिसरात पसरलेल्या आपल्या आलिशान बंगल्यात एक भव्य स्विमिंग पूल देखील तयार केला होता. याप्रकरणाची आता चौकशी सुरू आहे.

आतापर्यंत दोन डजनहून अधिक जमिनींची नोंदणी, अनेक वाहनं, आलिशान बंगला, सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. भ्रष्टाचाराचा आरोप सुधा सिंह यांच्यावर करण्यात आल्यानंतर कोर्टाकडून सर्च वॉरेंट जारी करण्यात आलं होतं. त्याअंतर्गत लोकायुक्तांनी कारवाई केली आहे. सुधा सिंह यांचे पती कंत्राटदार आहेत.

छापेमारीत कोट्यवधींची संपत्ती समोर आली आहे. अजूनही कारवाई सुरू असून सुधा सिंह यांच्या एकूण संपत्तीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एका सर्वसाधारण सरपंचाची ही डोळे दिपवून टाकणारी संपत्तीपाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बैजनाथ आणि शारदापुरम कॉलनी या दोन ठिकाणी सरपंचांच्या घरावर छापे टाकण्यात आले. या दोन्ही घरांची किंमत दोन ते अडीच कोटी असल्याची माहिती समोर आली आहे.

सुधा सिंह यांच्या नावावर दोन क्रेशर मशीन, १ मिक्चर मशीन, एक ब्रिक मशीन, ३० मोठी वाहनं यात चेन माऊंट, जेसीबी, लोडर, ट्रॅक्टर, इनोव्हा, स्कॉर्पिओ, विटांची मशीन यांच्यासह सोन्याचांदीचे दागिने, विमा पॉलिसी, ३६ भूखंड आणि रोखरक्कम प्राप्त झाली आहे. यासर्वांची किंमत १९ कोटींच्या वर असल्याचं सांगण्यात येत आहे.