अभिमानास्पद! रतन टाटा यांना मिळणार ‘आसाम वैभव’; सर्वोच्च नागरी पुरस्काराने होणार सन्मान, पाहा, कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 02:39 PM2021-12-04T14:39:31+5:302021-12-04T14:45:42+5:30

आसाम सरकारतर्फे दिला जाणार सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव हा रतन टाटा यांना दिला जाणार आहे.

आताच्या घडीला जगभरात सर्वत्र बोलबाला आहे तो दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचाच. यामागे अनेक कारणे आहे. सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे ६८ वर्षांनी Air India ची टाटा समूहात झालेली घरवापसी आणि दुसरे म्हणजे TATA च्या अनेकविध कंपन्यांची सुरु असलेली यशस्वी घोडदौड.

रतन टाटा यांचा केवळ भारतात नाही, तर जगभरात दबदबा आहे. रतन टाटा यांनी अनेक रसातळाला गेलेल्या कंपन्यांना नवसंजीवनी दिल्याचे सांगितले जाते. यातच आता आसाम सरकारतर्फे दिला जाणार सर्वोच्च नागरी पुरस्कार रतन टाटा यांना दिला जाणार आहे.

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, TATA सन्सचे मानद चेअरमन रतन टाटा यांना आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या आसाम वैभव याने सन्मानित केले जाणार आहे. यापूर्वी आसाम रत्न नावाने हा पुरस्कार ओळखला जायचा.

TATA ट्रस्ट आणि आसाम सरकारने सन २०१८ मध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी १९ ठिकाणी केंद्रे स्थापन करण्यासाठी मोठी योजना आखली होती. याची पायाभरणी रतन टाटा यांच्या हस्ते करण्यात आली होती.

१८ जून रोजी झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह हेदेखील उपस्थित होते. या योजनेसाठी सुमारे २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

या एकूण २२०० कोटींपैकी अर्धी गुंतवणूक TATA ची असून, उर्वरित रक्कम राज्य सरकार खर्च करणार आहे. रतन टाटा यांनी कर्करोगाच्या उपचारासाठी दिलेल्या या अतुलनीय योगदानासाठी आसाम बैभव सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

TATA ट्रस्ट आणि आसाम सरकारमध्ये या कॅन्सरग्रस्त रुग्णांवरील उपचारासाठी उभारल्या जात असलेल्या केंद्रांसाठी एका करारावर स्वाक्षरीही करण्यात आली आहे. ०२ डिसेंबर रोजी आसाम दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने या पुरस्काराची घोषणा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

रतन टाटा यांची जीवन प्रवास हा तितकाच रंजक आणि संघर्षमय आहे. टाटांसारख्या बड्या कुटुंबात जन्मलेल्या रतन टाटा यांना सर्व गोष्टी सहजरित्या मिळाल्या असे नाही. त्यासाठी त्यांनाही कष्ट करावे लागले.

तेच रतन टाटा जगभरातील अनेक उद्योजकांपैकी आघाडीचे उद्योजक आहेत. टाटा कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते. रतन टाटा यांची मेहनत आणि कठोर परिश्रम यामुळे टाटा यांचं नावलौकीक आहे.

रतन टाटा यांच्याकडे कार आहेत तसं फाइट जेटही आहेत. त्यांच्याकडे पायलटचं लायसन्स आहे. एकेकाळी भारतीय एअर फोर्स ए-१६ फायटर जेट त्यांनी उडवले आहे. रतन टाटा यांच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या ताफ्यात अनेक लग्झरी कार पाहायला मिळतील.

रतन टाटा यांना गाड्यांचा शौक आहे. त्यांच्याकडे जगुआर, मर्सिडीज एसएल ५००, फरारी कॅलिफोर्निया, लँड रोव्हर फ्रिलँडरसारख्या महागड्या गाड्या आहेत. रतन टाटा हे सोयीसुविधा युक्त असलेल्या बंगल्यात राहतात.

कुलाबाच्या समुद्रकिनारी त्यांचे घर आहे. ३ मजल्याची इमारत १३ हजार फूटाची आहे. यातील पहिल्या भागात सन डेक आणि लिविंग एरिया आहे. तर बाकीच्या भागात जीम, लायब्रेरी, स्विमिंग पूल आणि लाऊज आणि स्टडी रुम आहेत. रतन टाटा यांची एकूण संपत्ती पाहिली तर नेट वर्थ डॉटनुसार १ बिलियन डॉलर इतकी आहे.

TATA ग्रुप आताच्या घडीला अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. TATA ग्रुपच्या अनेक कंपन्या भन्नाट रिटन्सही देत आहेत. TATA ग्रुप जगात सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा अनेकविध क्षेत्रात TATA ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.