President Election: राष्ट्रपती निवडणूक; NDA कडे 9000 मतांची कमतरता, असा असेल मोदी-शाह यांचा 'मास्टरप्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 02:19 PM2022-04-17T14:19:05+5:302022-04-17T14:23:28+5:30

President Election: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा रणनिती आखत आहेत. इतर नेत्यांनाही महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली: येत्या काही महिन्यात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. संसद आणि राज्य विधानसभांच्या दोन्ही सभागृहांमध्ये भाजप आणि युतीची ताकद लक्षात घेता, या दोन्ही पदांवर एनडीएचे उमेदवार निवडून येणार हे जवळपास निश्चित आहे.

भाजपकडून रणनीती आखण्याचे काम स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा करत आहेत. संपर्क, संवाद आणि समन्वयाची जबाबदारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी सांभाळतील. याशिवाय विविध राज्यांतील नेतृत्व भाजप आणि एनडीएच्या मुख्यमंत्र्यांकडे असेल.

राष्ट्रपती निवडणुकीची अधिसूचना जून महिन्यात जारी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेतृत्वाने याबाबत आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्याच बरोबर बिगर एनडीए पक्षांना आपल्याकडे ओढण्याचे कामही सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यापासून भाजप बिगर एनडीए पक्षांशी औपचारिक संवाद आणि संपर्काचे काम सुरू करणार आहे. भाजप राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी करत असलेल्या रणनीती टीमच्या केंद्रस्थानी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा असतील. तर, इतर नेते विविध भूमिका बजावतील.

लोकसभा रणनीतीच्या केंद्रस्थानी राजनाथ सिंह, राज्यसभेच्या केंद्रस्थानी पियुष गोयल महत्त्वाची भूमिका बजावतील. संघटना स्तरावर पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा काम पाहतील. तर, दोन्ही सभागृहात समन्वयाचे काम प्रल्हाद जोशी पाहणार आहेत. ज्या राज्यांमध्ये भाजप आणि एनडीएची सरकारे आहेत, तेथे मुख्यमंत्री समन्वयाचे काम पाहतील.

सर्वात आधी भाजप राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासाठी एकमत घडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, सध्याचे विरोधकांशी असलेले संबंध पाहता एकमत होण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत भाजप आपला विजय निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करेल.

बीजेडी आणि वायएसआरसीपी सारखे गैर-यूपीए पक्ष भाजपला पाठिंबा देण्यास बांधील आहेत. हे काम संसदेपासून राज्यांच्या विधानमंडळापर्यंत केले जाईल. त्यांना अनेक विषयांवर संसदेत बीजेडी आणि वायएसआरसीपीचा पाठिंबा मिळत आहे. याशिवाय इतर काही पक्षही भाजपला पाठिंबा देताना दिसतील.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. अशा स्थितीत जुलैमध्ये निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर उपराष्ट्रपदीपदाची निवडणूक होईल. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करू शकतात, त्यामुळे तेथे भाजप आणि एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल.

मात्र, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 10,98,903 मते आहेत, तर विजयाचा आकडा 5,49,452 आहे. यामध्ये एका खासदाराच्या मतांचे मूल्य 708 आहे. देशातील 4,120 आमदारांपैकी प्रत्येक राज्याची लोकसंख्या आणि जागांच्या संख्येनुसार आमदाराच्या मतांचे मूल्य बदलते. उत्तर प्रदेशच्या आमदाराला सर्वाधिक 208 मतं आहेत.

संसद आणि राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष एनडीएला जवळपास 9,000 मतांची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत काही प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा घेऊन भाजप ही निवडणूक सहज जिंकेल.