पंतप्रधान नरेंद्र मोदीचा नवा मास्टर प्लॅन?; ७० केंद्रीय मंत्र्यांचा जम्मू-काश्मीर दौरा, नेमकं काय घडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 11:04 PM2021-09-03T23:04:43+5:302021-09-03T23:09:46+5:30

Narendra Modi:गेल्या वर्षी केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरातील कलम ३७० रद्द केलं होतं. भारताच्या इतिहासातील तो ऐतिहासिक निर्णय होता.

जम्मू काश्मीरमध्ये(Jammu Kashmir) पुन्हा निवडणुका घेण्यापासून ते राज्याला स्वायत्त दर्जा मिळण्यापर्यंत अनेक मुद्द्यावर आता उघडपणे चर्चा होऊ लागली आहे. काश्मीर खोऱ्याबाबत मोदी सरकारच्या रणनीतीवर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

यातच आता जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय मंत्री दौरा करणार असल्याचं समोर येत आहे. ७० केंद्रीय मंत्री १० सप्टेंबरपासून जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार असल्याची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी सर्वांना स्पष्ट संकेत दिले आहेत.

केंद्रीय मंत्र्यांना अशा भागात जायचं आहे ज्याठिकाणी थेट जनतेशी संवाद साधता येईल. लोकांच्या समस्या जाणून घेता येतील. लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यावर भर दिला जाईल. तसेच जम्मू काश्मीरात केंद्राचं विकास कार्य किती पूर्ण झालं याचा आढावा घेतला जाईल.

७० मंत्री करणार दौरा –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही सर्व जबाबदारी ७० केंद्रीय मंत्र्यांवर दिली आहे. त्यांना ९ आठवड्याच्या आत हे मिशन काश्मीर यशस्वी करावं लागेल. याबाबत भाजपा नेते रविंद्र रैना यांनी माध्यमांना संपूर्ण माहिती दिली.

रविंद्र रैना सांगतात की, ७० केंद्रीय मंत्री जम्मू काश्मीरच्या दुर्लभ भागात दौरा करतील. याठिकाणी प्रत्येक केंद्रीय मंत्र्याचा जनता दरबार आयोजित करण्यात येईल. हे मंत्री त्या त्या भागातील विकास कार्याचा आढावाही घेतील. कदाचित या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: काश्मीर खोऱ्याचा दौरा करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, याआधी जानेवारी २०२० मध्ये ३६ केंद्रीय मंत्र्यांच्या टीमनं जम्मू काश्मीरचा दौरा केला होता. तेव्हा जनतेशी थेट संवाद साधण्याचा सरकारचा प्रयत्न होता.

आता पुन्हा सरकार त्याच मार्गानं जाताना दिसत आहे. सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करुन हा मार्ग सुरु केला आहे. आता नवीन मिशन काश्मीर अंतर्गत खोऱ्यात विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा फायदा जम्मू काश्मीरच्या लोकांना मिळतोय का? याचा आढावा घेतला जाईल. मोदी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. केवळ दिखावा म्हणून हे केले जाते परंतु प्रत्यक्षात काहीही बदल होत नाही. अपेक्षा आहे की, आता तरी जम्मू काश्मीरच्या लोकांसाठी काहीतरी केले जाईल.

तर जम्मू काश्मीरमधले काँग्रेस नेते रमन भल्ला यांनी केंद्र सरकारच्या या मोहिमेला इमेज बिल्डिंग नाव दिलं आहे. मोदी सरकार जम्मू काश्मीरमध्ये विकास करण्यात पूर्णत: अपयशी राहिली आहे. काश्मीर खोऱ्यात बेरोजगारीची समस्या वाढली आहे अशी टीका त्यांनी केली.

परंतु केंद्र सरकारच्या या मोहिमेची चर्चा यामुळे आहे आता जम्मू काश्मीरात निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. ही मोहिम संपल्यानंतर यावर मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.