Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:47 IST2025-08-06T13:34:58+5:302025-08-06T13:47:50+5:30

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली जवळ खीर गंगा नदीवर झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढगफुटीमुळे नदीत पूर आला असून, त्यामुळे धराली गावातील २० ते २५ हॉटेल्स आणि होमस्टे वाहून गेल्याचा अंदाज आहे.

मंगळवारी उत्तरकाशीतील हर्षिलजवळील धराली परिसरात ढगफुटीमुळे एक गाव वाहून गेले आहे. अपघातानंतरच्या छायाचित्रांमध्ये गावावर वाळू आणि चिखलाचे ढिगारे दिसत होते. अपघातात अनेक लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उत्तरकाशी पोलिसांनी सांगितले की, ढगफुटीनंतर हर्षिल परिसरातील खीरगंगा नदीला आलेल्या पुरामुळे धरालीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस, एसडीआरएफ, लष्कर आणि इतर पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत.

उत्तराखंड पोलिसांनी असेही सांगितले की आपत्कालीन सेवा अधिकारी आणि पथके बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने (IMD) उत्तराखंडच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

गावातील राजेश पनवार यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, सुमारे २० ते २५ हॉटेल्स आणि होमस्टे पाण्यात वाहून गेले आहेत. गावात बराच कचरा आहे. त्यामुळे मदतकार्य खूप कठीण झाले आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विटरवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहेत. ते म्हणाले की, मी सतत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

गंगोत्री धामचा मुख्य थांबा म्हणजे धराली. स्थानिक प्रत्यक्षदर्शी राजेश पनवार यांनी सांगितले की, खीर गंगेच्या पाणलोट क्षेत्रावर ढग फुटला. त्यामुळे नदीत अचानक विनाशकारी पूर आला. नदीचा विनाशकारी पूर खूप वेगाने पुढे सरकला. जो कोणी त्याच्या मार्गात आला तो उद्ध्वस्त झाला, गवतासारखा वाहून गेला.

भारतीय लष्करानेही मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. हर्षिलजवळील परिसरातील धराली गावात अचानक भूस्खलन झाल्याचे आणि पूर आल्याचे लष्कराने सांगितले. घटनास्थळी बचाव कार्यासाठी भारतीय सैन्यदल धावून आले आहे.