'INDIA' आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा मल्लिकार्जुन खरगेंकडे; यामागचा अर्थ काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 05:38 PM2024-01-13T17:38:15+5:302024-01-13T17:42:59+5:30

विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शनिवारी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. इंडिया आघाडीच्या या पाचव्या बैठकीत १० प्रमुख नेते उपस्थित होते. त्यात खरगे यांना प्रमुख म्हणून नेमण्यावर सर्वांनीच सहमती दर्शवली

परंतु खरगे यांच्या नावाची घोषणा इंडिया आघाडीतील इतर पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करून करण्यात येईल. या व्हर्चुअल मिटिंगला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी झाल्या नाहीत. त्याचसोबत सपाचे नेते अखिलेश यादव आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही या बैठकीला गैरहजर होते.

या बैठकीपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना महाआघाडीचे समन्वयक बनवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात होती, मात्र तसे झाले नाही. मात्र अखेर खरगे यांना इंडिया आघाडीचे अध्यक्ष करण्याचे राजकीय अर्थ काय आहेत? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीचे मुख्य बनवणे म्हणजे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे ते उमेदवार असतील का? कारण मागील बैठकीत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खरगेंना उमेदवार बनवावं असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

दलित समुदायातून पुढे आलेले खरगे यांना पंतप्रधानपदासाठी पुढे केल्यास त्याचा इंडिया आघाडीला फायदा होऊ शकतो अशी रणनीती असू शकते. खरगेंना विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचा चेहरा बनवलं जाऊ शकते का? तर याचे उत्तर नाही असं आहे. कारण आघाडीचे प्रमुख असणे आणि पंतप्रधानपदाचे दावेदार असणे हे वेगळे आहे.

यूपीए काळात सोनिया गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी होती. परंतु प्रत्यक्षात सरकार आल्यावर सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारत मनमोहन सिंग यांच्याकडे जबाबदारी दिली. त्यामुळे आघाडीचे प्रमुख बनवणे म्हणजे पंतप्रधानपदाचा चेहरा असणं यारितीने हे पाहता येत नाही.

इंडिया आघाडीचे संयोजक अथवा मुख्य कोण असेल हे ठरवणे आव्हानात्मक होते. मात्र विरोधकांनी हे आव्हान पूर्ण केले आता जागावाटप प्रमुख मुद्दा आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे ३-४ महिने वाचले आहेत. परंतु विरोधी आघाडी कोणत्या राज्यात कोण किती जागा लढवेल हे अद्याप ठरवू शकली नाही.

इंडिया आघाडीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रत्येक घटक पक्षासोबत स्वतंत्र चर्चा सुरू केली आहे. त्यात ममता बॅनर्जी यांच्यासोबत जागावाटपाची चर्चा जटील बनली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, महाराष्ट्र, यूपी, पंजाब, दिल्लीसारख्या राज्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणे हे विरोधकांपुढे सर्वात मोठे आव्हान असणार आहे

जागावाटपाच्या चर्चेतून तडजोडी आणि मार्ग निघाला नाही तर काही पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका निभावू शकतात त्यामुळे जागावाटप हा प्रमुख मुद्दा आहे. मल्लिकार्जुन खरगे यांना आघाडीचे अध्यक्ष बनवल्यानंतर आता संयोजक नेमण्याची शक्यता फार कमी आहे. यूपीएमध्येही सोनिया गांधी अध्यक्ष होत्या परंतु कुणीही संयोजक नव्हते.

दुसरीकडे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात एनडीएचे संयोजकपद राहिले होते कुणीही अध्यक्ष नव्हते. जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव, चंद्रबाबू नायडूसारखे नेते एनडीएचे संयोजक राहिले आहेत. सध्या एनडीएच्या संयोजकपदी कुणाचीही नेमणूक नाही. त्यात इंडिया आघाडीत खरगेंना अध्यक्ष बनवले तर संयोजकपदी नितीश कुमारांची नियुक्ती होण्याची शक्यता कमी आहे. तर मला कुठल्याही पदात रस नाही. आघाडी मजबूत राहावी असं नितीश कुमारांनीही बैठकीत सांगितल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नितीश कुमारांनी माघार घेतली की इंडिया आघाडीत ते नाराज आहेत त्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. आगामी काळात या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत.