आईच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींची खास तयारी, देणार स्पेशल गिफ्ट; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 07:34 AM2022-06-17T07:34:43+5:302022-06-17T07:40:14+5:30

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben 100th Birthday) यांचा १८ जून रोजी १०० वा वाढदिवस आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben 100th Birthday) यांचा १८ जून रोजी १०० वा वाढदिवस आहे. याच दरम्यान मोदी देखील गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आईच्या वाढदिवशी तिची भेट घेण्याची शक्यता आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निरोगी आयुष्यासाठी वडनगर येथे काही धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. दुसरीकडे गांधीनगर येथे एका नव्या रस्त्याला त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं नाव दिलं जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असणार आहेत. यात ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत आणि २१ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक अनेक उपक्रमांचं उदघाटन ते करणार आहेत.

पंतप्रधान मोदींचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ साली झाला होता. यंदा १८ जून २०२२ मध्ये त्या आपल्या १०० व्या वर्षात पाऊल टाकत आहेत. पंतप्रधान देखील याच दिवशी गुजरातमध्ये आहेत आणि ते मातोश्रींच्या वाढदिवशी पावागढ येथील मंदिराला भेट देतील. त्यानंतर वडोदरा येथील एका रॅलीला संबोधित करतील. याच दरम्यान ते आपल्या मातोश्रींची भेट घेण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्या नावानं गांधीनगरमध्ये एका रस्त्याचं लोकार्पण देखील होणार आहे. गांधीनगर येथे रायसणला जोडणाऱ्या रस्त्याला हिराबेन मोदी यांचं नाव दिलं जाणार आहे.

हिराबेन मोदी सध्या नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत गांधीनगर येथे राहतात. गांधीनगरमध्ये असतानाच पंतप्रधान मोदी आपल्या मातोश्रींची १०० व्या वाढदिवसानिमित्त भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गुजरातच्या वडनगर येथे हाटकेश्वर महादेव मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या वाढदिवसानिमित्त खास धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवआराधना, भजन संध्या आणि सुंदरकांड पाठ अशा विविध कार्यक्रमांचा यात समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मातोश्री हिराबेन यांच्यासाठी काही खास भेट आणणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. यावेळी मातोश्रींचा आशीर्वाद घेऊन मोदी आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना होतील अशी शक्यता आहे.

मोदींच्या गुजरात दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. प्रशासन पूर्णपणे सज्ज असून दोन दिवसांच्या दौऱ्यात मोदी कार्यक्रमांचा सपाटा लावणार आहेत. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मोदी मातोश्रींचीही धावती भेट घेतील अशी शक्यता आहे.