Mood of the Nation Survey: मोदींचा उत्तराधिकारी कोण? शाह, योगी की गडकरी...की चौथाच कुणी? बिहार सत्तांतरानंतर सर्व्हे आला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 11:22 AM2022-08-12T11:22:15+5:302022-08-12T11:29:29+5:30

Mood of the Nation Survey: देशात आज निवडणुका झाल्या तर बिहारमधील सत्तांतरामुळे एनडीएला लोकसभेत २० जागांचे नुकसान होणार आहे. या सत्तांतरानंतर एक मोठा सर्व्हे समोर आला आहे.

देशात आज निवडणुका झाल्या तर बिहारमधील सत्तांतरामुळे एनडीएला लोकसभेत २० जागांचे नुकसान होणार आहे. या सत्तांतरानंतर एक मोठा सर्व्हे समोर आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच २०२४ साठी बहुतांश लोकांची पसंती असली तरी जर मोदींनी ती निवडणूक लढविली नाही, तर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल? यावरही प्रकाश पडू लागला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहिले जात आहे. आज तक आणि सी व्होटरने केलेल्या Mood of the Nation (MOTN) सर्व्हेमध्ये भाजपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण असा सवाल विचारण्यात आला होता. यावर लोकांनी अमित शहा आणि आदित्यनाथ यांच्यात कडवी टक्कर असल्याचे सांगितले.

भाजपातील चेहरा कोण असेल यावर, सर्व्हेमध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांनी अमित शहा यांना २५ टक्के, योगी आदित्यनाथ यांना २४ टक्के, नितीन गडकरींना १५ टक्के, राजनाथ सिंह यांना ९ टक्के आणि निर्मला सीतारामन यांना ४ टक्के समर्थन दिले. हे झाले भाजपातील पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याचे. परंतू, शहा-योगींनाही मागे काढणारा एक चेहरा पुढे आला आहे. तो भाजपातील नसला तरी सध्या दोन राज्यांत सत्ता काबिज करून गुजरातमध्ये मोदींच्या किल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी निघाला आहे.

सर्व्हेमध्ये पुढील पीएम कोण असेल असे विचारण्यात आले होते. ५३ टक्के लोकांनी नरेंद्र मोदींचे नाव घेतले. तर राहुल गांधींना ९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. अरविंद केजरीवाल यांचीही पसंती वाढू लागली आहे. पंतप्रधानांच्या पसंतीच्या यादीत त्यांनी योगी आणि अमित शहा यांना मागे टाकले आहे. केजरीवाल यांना 6 टक्के, योगी यांना 5 टक्के आणि अमित शहा यांना 3 टक्के मते मिळाली. यामुळे केजरीवाल येत्या काही वर्षांत पंतप्रधान पदाचा चेहरा असू शकतात.

याच सर्वेक्षणात ४२.८ टक्के लोकांच्या मते नरेंद्र मोदींनी चांगले काम केले आहे. 22 टक्के लोकांनी त्यांचे काम उत्कृष्ट असल्याचे म्हटलेय परंतू, 13.2 लोकांनी खराब आणि 12.9 लोकांनी मोदींचे काम अत्यंत खराब असल्याचे रेटिंग दिले आहे. 25 टक्के लोकांनी म्हटले की, सरकारने कोरोनाच्या काळात चांगले काम केले आहे. 370 कलम काढून टाकणे ही सरकारची मोठी उपलब्धी असल्याचेही १५ टक्के लोकांचे म्हणणे आहे.

ईडीच्या कारवाईची देशभर चर्चा आहे. CVoter च्या सर्वेक्षणात ईडी, सीबीआयचा गैरवापर होत आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर 38 टक्के लोकांनी होय आणि 41 टक्के नाही असे उत्तर दिले. 39 टक्के लोकांच्या मते देशातील जातीय वातावरण बिघडले आहे. 34 टक्के लोकांनुसार सलोखा वाढला आहे. 18 टक्के लोक न्युट्रल राहिले आहेत.

मोदी सरकारमधील सर्वोत्तम मंत्री कोण या प्रश्नावर 22.5% लोकांनी नितीन गडकरींना सर्वाधिक मतदान केले. लोकप्रिय मंत्र्यांच्या यादीत राजनाथ सिंह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 20.4% लोकांनी मतदान केले. अमित शहा 17.2% मतांसह तिसऱ्या, एस जयशंकर 4.7% मतांसह चौथ्या आणि स्मृती इराणी 4.6% मतांसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

1 ऑगस्टपर्यंत लोकसभा निवडणुका झाल्या असत्या तर एनडीएला 307 जागा मिळाल्या असत्या तर यूपीएला 125 जागा मिळाल्या असत्या. यासोबतच इतरांना 111 जागा जाण्याचा अंदाज होता. परंतू, आता नितीशकुमारांनी भाजपाची साथ सोडल्याने गणित बदलले आहे. लोकसभेला एनडीएच्या जागा 286 वर येतील. त्यांना 21 जागांचे नुकसान होणार आहे. असे असले तरी एनडीए एकहाती सत्तेत येईल.