प्रेमासाठीही केली होती बंडखोरी; धर्माच्या सीमा ओलांडणारी सचिन पायलट यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 02:08 PM2020-07-13T14:08:26+5:302020-07-13T14:27:58+5:30

काँग्रेस नेते सचिन पायलट सध्या यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे नेते व राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध बंड पुकारल्याचे स्पष्ट झाले असून, ते आता भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ते 30 आमदारांसह भाजपामध्ये जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

सचिन पायलट यांनी प्रेमासाठीसुद्धा बंड करावा लागला होता. आज आम्ही तुम्हाला यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगणार आहोत. यांच्या नावावर सर्वात कमी वयात खासदार होण्याचा विक्रम आहे. राजस्थानातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या सचिन पायलट यांना प्रेमासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता.

या प्रेमकहाणीची सुरूवात साधारण 2004 च्या आसपास झाली. सचिन पायलट एमबीए पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले होते. तिथे त्यांची भेट जम्मू काश्मीर आणि दिल्लीच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते असलेल्या फारुक अब्दुल्ला यांची कन्या सारा अब्दुल्ला यांच्याशी झाली. या दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

शिक्षण पूर्ण झाल्यावर सचिन पायलट मायदेशी परतले. मध्यंतरीच्या काळात सारा यांनी सचिन आणि त्यांच्या नात्याची कल्पना आईला दिली होती. मात्र त्यांनी या नात्याला विरोध केला. सचिन भारतात परतल्यावर नात्यातला दुरावा वाढला आणि प्रेमाची अग्निपरीक्षा सुरू झाली.

सचिन यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन कुटुंबाची समजूत घातली. मात्र अब्दुल्ला कुटुंबाचा विरोधा काही केल्या मावळत नव्हता. सारा त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या.

या नात्याची कुजबूज हळूहळू सर्वत्र होऊ लागली. याचे राजकीय परिणाम अब्दुल्ला कुटुंबाला सहन करावे लागले. त्यामुळे फारुख अब्दुल्ला यांचा विरोध आणखी तीव्र झाला.

मैत्री ते प्रेम हा टप्पा सचिन आणि सारा यांच्यासाठी सोपा होता. मात्र प्रेम ते लग्न हा टप्पा त्यांच्यासाठी अतिशय आव्हानात्मक होता. या काळात या दोघांनी एकमेकांना खंबीरपणे साथ दिली.

सचिनसोबतच्या नात्याला कुटुंबाची मान्यता मिळावी, यासाठी सारा यांनी खूप प्रयत्न केले. मात्र अब्दुल्ला कुटुंबानं हे नातं स्वीकारलं नाही.

अखेर जानेवारी 2004 मध्ये सारा आणि सचिन विवाह बंधनात अडकले. यानंतर अब्दुल्ला कुटुंबानं सारासोबतचे संबंध तोडले. या लग्नाला कुटुंबातील एकही व्यक्ती आली नाही.

मात्र लग्नानंतर पायलट यांच्या कुटुंबानं सारा यांना कधीही याची उणीव जाणवू दिली नाही.

अखेर काही वर्षानंतर अब्दुल्ला कुटुंबानं या नात्याला मान्यता दिली अन् ही प्रेम कहाणी सुफळ संपूर्ण झाली.

(image credit_ appoiments, Quora, aviatorflight.com,gud story)