बापरे! मुलाच्या पोटातून एक-दोन नव्हे तर ३० लोखंडाचे खिळे अन् स्क्रू ड्रायव्हर काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 01:01 PM2020-10-05T13:01:41+5:302020-10-05T13:11:33+5:30

उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात रविवारी एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले. येथील चंद्र कुसुम रुग्णालयात एका मुलाला पोटात दुखत असल्यामुळे उपचारांसाठी आणले.

ज्यावेळी डॉक्टरांनी या मुलाला तपासून त्याचा रिपोर्ट पाहिला, त्यावेळी ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना सुद्धा धक्का बसला. कारण, या मुलाच्या पोटात चक्क खिळे दिसत होते.

शनिवारी रात्री करण नावाचा मुलगा रुग्णालयात आला, ज्याच्या पोटात दुखत होते. त्यामुले डॉक्टरांनी मुलाच्या पोटाची तपासणी केली. यावेळी रिपोर्टमध्ये विचित्र साहित्य पोटात दिसले. त्यामुळे डॉक्टरांनी आपत्कालीन परिस्थितीत ऑपरेशन थिएटर तयार करुन तातडीने ऑपरेशनची तयारी केली.

३ तास चाललेल्या ऑपरेशनमध्ये, मुलाच्या पोटातून ज्या वस्तू बाहेर काढल्या त्या पाहून डॉक्टरांची सुद्धा झोप उडाली. मुलाच्या पोटातून ३० खिळे, १ स्क्रू ड्रायव्हर आणि एक छोटासा लोखंडी बार डॉक्टरांनी बाहेर काढले. या सर्व साहित्याचे वजन ३०० ग्रॅम होते. दरम्यान, ऑपरेशननंतर मुलगा सुरक्षित आहे.

गेल्या २ महिन्यांपासून करणच्या पोटात दुखत होते. त्यामुळे त्याला पोटदुखी होती, ज्यामुळे त्याने आपल्या मुलाला कानपूरसह उन्नावमधील अनेक डॉक्टरांना दाखवले, पण काही उपयोग झाला नाही, असे करणच्या आईने सांगितले.

याचबरोबर, करणच्या पोटात सतत दुखत होते. त्यानंतर चंद्र कुसुम रुग्णालयात दाखल केले आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ऑपरेशनही केले. आता करण सुरक्षित आहे आणि या रुग्णलयात आल्यापासून करणला कोणताही त्रास नाही, म्हणूनच डॉक्टरांना देवाचे रूप म्हटले गेले आहे, असेही करणची आई म्हणाली.

हे खूप कठीण ऑपरेशन होते. यासाठी बराच वेळ लागला, असे डॉक्टर संतोष कुमार यांनी सांगितले. डॉ. पवन सिंह, डॉ. आशिष पुरी, डॉ. राधा रमण अवस्थी, डॉ. संतोष आणि डॉ. सर्वेश यांच्या टीमने ऑपरेशन केले.

ऑपरेशनवेळी रुग्णाच्या पोटातून एक स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी लहान बार, खिळे आणि पाच-सहा लहान सुया बाहेर काढल्या. जवळपास पोटात लहान-मोठ्या मिळून ३६ वस्तू होत्या. त्याचे वजन ३०० ग्रॅम इतके होते.

Read in English