IMD Alert : हवामान खात्याकडून दिला जाणारा रेड, ऑरेंज, एलो अलर्ट म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या रंगांचा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 15:50 IST2025-05-22T15:44:54+5:302025-05-22T15:50:01+5:30

IMD Colour Coded Warning Meaning: आयएमडीने जारी केलेल्या प्रत्येक कलर कोड किंवा अलर्टचा अर्थ काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

कडक उन्हाळा असो किंवा थंडीची लाट वा पावसाळा, भारतीय हवामान विभाग (IMD) जारी करत असलेले अलर्ट टीव्ही किंवा मोबाईलच्या बातम्यांमधून आपल्यापर्यंत पोहोचतात. हवामानाची तीव्रता आणि संभाव्य परिणाम दर्शविण्यासाठी आयएमडी चार रंग अर्थात कलरकोड वापरते.

देशातील पाऊस, चक्रीवादळ, वादळ, उष्णता, हिमवर्षाव यासारख्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी हे चारही कलर कोड जारी केले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का कोणता रंग कोणत्या धोक्याची सूचना दर्शवतो? चला जाणून घेऊया प्रत्येक कलर कोडचा अर्थ काय आहे...

हिरवा रंग : आयएमडीचा ग्रीन अलर्ट म्हणजे सर्व काही ठीक आहे. हा रंग हवामान परिस्थिती सामान्य असल्याचे दर्शवितो. या अलर्टमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याने, कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही.

पिवळा रंग : यलो अलर्ट सतर्क राहण्याचे संकेत देतो. हा कोड हवामान परिस्थिती अनेक दिवस टिकून राहण्याची शक्यता दर्शवितो. खराब हवामानामुळे लोकांच्या दैनंदिन कामावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, हवामानाचे अपडेट्स नियमितपणे घेण्यासोबतच, खबरदारी देखील महत्त्वाची असते.

नारिंगी रंग : ऑरेंज अलर्ट अत्यंत खराब हवामानाचा इशारा देतो. हा रंग एखाद्या व्यक्तीला रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक खंडित होणे, वीज पुरवठ्यात व्यत्यय येणे इत्यादी समस्यांसाठी आगाऊ तयार राहण्यास सतर्क करतो.

लाल रंग : रेड अलर्ट म्हणजे तात्काळ कारवाई करा. याचा अर्थ असा की, हवामान परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, जी जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण करू शकते. यामध्ये पूर, वीजपुरवठा खंडित होणे, संपूर्ण वाहतूक कोंडी होणे आणि व्यापक नुकसान यांचा समावेश असू शकतो. या अलर्टमध्ये तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचा, आपत्ती व्यवस्थापन सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो.

अशा नियमित हवामान अपडेट्ससाठी तुम्ही आयएमडीची अधिकृत वेबसाईट www.imd.gov.in किंवा सोशल मीडिया @Indiametdeptला भेट देऊ शकता.