आत्मसमर्पणाला नकार आणि ८ दिवसांत नक्षलवादी हिडमाचा 'गेम ओव्हर'; ७६ सीआरपीएफ जवानांची केली होती हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:28 IST2025-11-19T16:21:15+5:302025-11-19T16:28:41+5:30
छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती जंगलात झालेल्या चकमकीत कुख्यात नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा आणि त्याची पत्नीसह एकूण सहा नक्षलवादी ठार झाले.

गेल्या दोन दशकांत ७६ सीआरपीएफ जवानांच्या हत्येसह २६ हून अधिक मोठ्या हल्ल्यांचा सूत्रधार असलेल्या हिडमाच्या मृत्यूमुळे माओवादविरोधी लढ्याला मोठे यश मिळाले आहे.

आत्मसमर्पण करण्यासाठी शेवटचा प्रयत्न केल्यानंतर आणि हिडमाच्या आईने व्हिडिओद्वारे केलेल्या आवाहनाला त्याने नकार दिल्यानंतर पुढील आठ दिवसांतच हा एन्काउंटर झाला. हिडमाचा 'दहशतवाद' संपवण्यासाठी एन्काउंटर हाच एकमेव मार्ग असल्याचे सुरक्षा दलांनी ठरवले होते.

१० नोव्हेंबर रोजी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी रायपूरहून ५५० किमी दूर हिडमाच्या गावी जाऊन त्याच्या आईला भेटले. त्यांच्या सल्ल्यानुसार आईने हिडमाला आत्मसमर्पणाचे आवाहन केले, मात्र हिडमाने ते नाकारले.

हिडमाने आत्मसमर्पणास नकार दिल्यावर, सुरक्षा दलांनी ठरवले की त्याचा जवळचा विश्वासू अंगरक्षक बरसे देवा हादेखील शरणागती पत्करणार नाही, त्यामुळे हिडमाच्या दहशतीचा अंत करण्यासाठी एन्काउंटर करणे हाच अंतिम उपाय आहे.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, सुरक्षा दलांना हिडमाचे स्थान अनेकदा कळले होते, पण यावेळी तो पळून जाण्यापूर्वीच पथक घटनास्थळी पोहोचले. गुप्तचर युनिट अधिक सतर्क होते. हिडमा नेहमी तेलंगणा सीमेतून राज्य बदलायचा. मात्र, यावेळी अटक टाळण्यासाठी त्याने दूर असलेल्या आंध्र प्रदेशातील मारेदुमिल्ली जंगल निवडले, जी त्याची सर्वात मोठी चूक ठरली.

ग्रेहाउंड्स युनिटला हिडमा येणार असल्याची माहिती एक दिवस आधी मिळाली. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी पहाटे १:३० वाजता नक्षलविरोधी पथकाने निवडक अधिकाऱ्यांसह घनदाट जंगलात गुप्त शोध मोहीम सुरू केली.

सकाळपर्यंत झालेल्या चकमकीत हिडमा, त्याची पत्नी मडकाम राजे ऊर्फ राजक्का आणि त्याचा सर्वात विश्वासू अंगरक्षक देवा यांच्यासह एकूण सहा नक्षलवादी मारले गेले.

हिडमा हा तीन-स्तरीय सुरक्षेत राहायचा. देवा हा सर्वात आतल्या थरात होता. हिडमाला भेटायला येणाऱ्या नक्षलवाद्यांनाही या तिन्ही थरांची परवानगी घ्यावी लागत होती. आत्मसमर्पण न करण्यामागे हिडमाची प्रचंड कट्टरता कारणीभूत होती.

















