एक बंदा काफी है! हारलेली बाजी भाजपानं जिंकली; कधीही पराभव न झालेल्या नेत्याची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 10:58 AM2024-02-28T10:58:18+5:302024-02-28T11:02:40+5:30

"एक बंदा काफी है..." हे ऐकल्यावर तुमच्या मनात बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांचं नाव येईल. पण आम्ही बोलत आहोत भाजपा नेते आणि हिमाचलचे राज्यसभा खासदार हर्ष महाजन यांच्याबद्दल. ज्यांनी आपल्या चाणक्य धोरणाने काँग्रेस उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा राज्यसभा निवडणुकीत पराभव केला.

६८ पैकी केवळ २५ आमदार असतानाही हर्ष महाजन यांनी हा विजय मिळवला आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आपल्या विजयाची खात्री होती. मात्र भाजपाने हर्ष महाजन यांना उमेदवारी देऊन काँग्रेसच्या गटात खळबळ उडवली. कारण हर्ष महाजन गेली अनेक दशके काँग्रेसमध्ये आहेत.

हिमाचल विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. अशा परिस्थितीत काँग्रेसचे अनेक आमदार त्यांच्या संपर्कात होते. राज्यसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी काँग्रेसचे अनेक आमदार आपल्या बाजूने मतदान करतील, असे सांगितले होते.

२७ जानेवारीला त्यांचे म्हणणे खरे ठरले आणि काँग्रेसच्या ६ आमदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केले. हर्ष महाजन हे आजपर्यंत एकही निवडणूक हरले नाहीत. त्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५५ रोजी हिमाचलमधील चंबा येथे झाला. महाविद्यालयीन जीवनापासून ते राजकारणात सक्रिय होते. १९८६ ते १९९५ पर्यंत प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते.

हर्ष महाजन यांनी १९९३ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. ते चंबा येथून आमदार झाले. चंबा विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा विजयी झाले. हर्ष महाजन हे हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. ते त्यांचे मुख्य रणनीतिकार मानले जात असे.

२००३ ते २००८ पर्यंत वीरभद्र सरकारमध्ये ते पशुसंवर्धन मंत्री होते. प्रदीर्घ काळ काँग्रेस पक्षात असलेले हर्ष महाजन यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष सोडला आणि भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र, या निर्णयाचा भाजपाला फायदा झाला नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ २५ जागा मिळाल्या.

विधानसभा निवडणुकीत ते काही विशेष करू शकले नसतील, पण यावेळी हर्ष महाजन यांनी काँग्रेसच्या गडाला छेद देऊन राज्यसभेची जागा जिंकली आहे. हर्ष महाजन यांच्या विजयानंतर भाजपाला राज्यात सरकार स्थापनेची स्वप्ने पडू लागली आहेत.

राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आठवडाभरात किंवा महिनाभरात राज्यात काँग्रेसचे सरकार पडेल असा दावा भाजपाचे नवनियुक्त खासदार हर्ष महाजन करत आहेत. मात्र हर्ष महाजन यांच्या या दाव्यात किती तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल.

हिमाचलमधील राज्यसभा निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर भाजपाकडे केवळ २५ आमदार होते. तर काँग्रेसकडे ४० आणि ३ अपक्ष आमदार होते. काँग्रेसच्या ६ आणि ३ अपक्ष आमदारांनी हर्ष महाजन यांच्या बाजूने मतदान केले. अशा स्थितीत सामना बरोबरीत राहिला.

हर्ष महाजन आणि अभिषेक मनू सिंघवी यांना ३४-३४ मते मिळाली. अशा परिस्थितीत निकाल लावण्यासाठी लॉटरीचा आधार घ्यावा लागला. यामध्ये नशिबाने साथ दिल्याने हर्ष महाजन विजयी झाले असून काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला आहे.