अजबच...! एप्रिलमध्ये ज्याचा कोरोनानं मृत्यू झाला, त्यालाच जुलैमध्ये मिळाला लसीचा दुसरा डोस; असं आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 02:27 PM2021-07-19T14:27:10+5:302021-07-19T14:39:01+5:30

वर्सीभाई म्हणाले, तीन दिवसांच्या मोठ्या प्रयत्नांनंतर मी थराड येथे एका खासगी रुग्णालयात वडिलांना दाखल केले. पण.....

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील वर्सीभाई परमार यांच्या मोबाइलवर आलेला एक मेसेज अक्षरशः त्यांच्या जखमेवर मिठ चोळणाराच होता. याच वर्षी 23 एप्रिलला त्यांचे वडील 70 वर्षीय हरिजी लक्ष्मण परमार यांचा कोरोनाने मृत्यू झाला. अद्यापही त्यांचे कुटुंब या दुःखातून सावरलेले नाही. मात्र, 14 जुलैला त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. यात, अभिनंदन, आपल्या वडिलांना कोविड-19 लसीचा दुसरा डोसही मिळाला,असे लिहिलेले होते. (प्रतिकात्मक फोटो)

प्रशासनाचा निश्काळजीपणा आणि अव्यवस्थेमुळे वर्सीभाई प्रचंड संतापले आहेत. वर्सीभाई म्हणतात, की त्यांच्या वडिलांना त्यावेळी रुग्णालयात बेड आणि ऑक्सीजनही मिळाला असता, तर आज ते जिवंत असते. (प्रतिकात्मक फोटो)

वर्सी म्हणाले, लस व्यवस्थापनाचे घोर दुर्लक्ष आणि यंत्रणेचा निष्काळजीपणा म्हणजे माझ्या वडिलांची थट्टा आहे. त्यांना आधीच लस मिळाली असती, तर त्यांचे प्राण वाचले असते. (प्रतिकात्मक फोटो)

लसीचा पहिला डोसही मिळाला नव्हता - टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, वर्सीभाई यांनी म्हटले आहे, क माझ्या वडिलांना लसीचा पहिला डोसही मिळाला नव्हता. त्यामुळे हे म्हणजे, जखमेवर मिठ चोळल्यासारखे आहे. (प्रतिकात्मक फोटो)

गुजरातमध्ये अशा प्रकारच्या चुकीचे हे पहिलेच प्रकरण नाही. तर अनेक लोकांना कोविन अॅपच्या माध्यमाने मेसेज पाठवले जात आहेत. यांपैकी अनेकांचा मृत्यूही झालेला आहे. (प्रतिकात्मक फोटो)

बनासकांठा जिल्ह्यातील साइगम तालुक्यात रादोसन गावात राहणाऱ्या वर्सीभाई यांनी सांगितले, की एक व्यक्ती उपचारा अभावी मरते आणि व्यवस्था त्यांना कोविड-19 ची लस देते. यातून काय साध्य करायचे आहे. (प्रतिकात्मक फोटो)

वर्सीभाई यांनी सांगितले, की आपल्या वडिलांच्या उपचारासाठी आपल्याला तीन दिवस या रुग्णालयातून त्या रुग्णालयात खेट्या घालाव्या लागल्या होत्या. पालनपूर सिव्हिल रुग्णालयाबाहेर शेकडो रुग्ण इकडे तिकडे पडलेले होते. यातील अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. माझ्या वडिलांना तेथे बेड मिळाला नाही. (प्रतिकात्मक फोटो)

वर्सीभाई म्हणाले, तीन दिवसांच्या मोठ्या प्रयत्नांनंतर मी थराड येथे एका खासगी रुग्णालयात वडिलांना दाखल केले. मात्र, तोवर उशीर झाला होता आणि ऑक्सिजन सॅच्युरेशनच्या कमतरतेमुळे त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिकात्मक फोटो)

त्यांना ज्या दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच्या तीन दिवसानंतर म्हणजेच, 23 एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला, असे वर्सीभाई म्हणाले. (प्रतिकात्मक फोटो)

हरिजी यांचे जावई शिवराम म्हणाले, राज्यात योग्य व्यक्तीलाच लस मिळेल आणि त्याच व्यक्तीला यासंदर्भ मेसेज जाईल. यासाठीचे नियम राज्य शासनाने निश्चित करायला हवे. (प्रतिकात्मक फोटो)