Gujarat Election 2022: रॉयल फॅमिलीची व्हिंटेज कारमधून एन्ट्री; ॲनिमल केअरसाठी खास बूथ, पाहा गुजरात निवडणुकीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 03:55 PM2022-12-01T15:55:12+5:302022-12-01T16:01:41+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सौराष्ट्र-कच्छ आणि राज्याच्या दक्षिणेकडील 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान सुरू आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सौराष्ट्र-कच्छ आणि राज्याच्या दक्षिणेकडील 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 25,393 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदानाची वेळ सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. आज 788 उमेदवारांचे नशीब मतदान पेटीत बंद होणार आहे. पहिल्या टप्प्यात 339 अपक्षही रिंगणात आहेत.

क्रिकेटपटू रवींद्र जडेजा मतदान करण्यापूर्वी पूजा करण्यासाठी पोहचला. यासोबत त्याची पत्नी देखील उपस्थित होती. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा या जामनगर उत्तरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

भारतातील कोणत्याही निवडणुकीत प्रथमच ॲनिमल केअरसाठी खास बूथ तयार करण्यात आले आहे. जुनागडच्या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एक बूथ बनवण्यात आला, जिथे मतदार त्यांची जनावरे घेऊन येतात आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेत असते. इथे लोक जनावरे आणतात आणि मतदान करतात.

राजकोटमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एका वृद्ध मतदाराला मतदान करण्यास सुरक्षा कर्मचारी मदत करत असल्याचे पाहायला मिळाले. निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते गृहमंत्री अमित शाह आणि राहुल गांधींपासून ते आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

सुरतच्या मजुरा विधानसभा मतदारसंघात जैन समाजाच्या लोकांनी पूजेच्या वातावरणात मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यात भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी व्यतिरिक्त इतर 36 राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये बहुजन समाज पक्ष (BSP), समाजवादी पक्ष (SP), भारतीय कम्युनिस्ट पार्टी-मार्क्सवादी (CPI-M) आणि भारतीय आदिवासी पक्ष (BTP) यांचा समावेश आहे.

राजकोटच्या राजघराण्यातील सदस्य मंधाता सिंग जडेजा, कादंबरी देवी जडेजा आणि मृदुला कुमारी जडेजा यांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी व्हिंटेज कारमधून हजेरी लावली.

गुजरातमध्ये एकूण 4,91,35,400 मतदार आहेत. ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात 2,39,76,670 मतदारांना मतदान करायचे आहे. पहिल्या टप्प्यात 18-19 वयोगटातील 5.74 लाख मतदार आणि 99 वर्षांवरील 4,945 मतदारांचा समावेश आहे. एकूण 14,382 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्यापैकी 3,311 शहरी आणि 11,071 ग्रामीण भागातील आहेत.

सौराष्ट्र-कच्छ विभागात 54 जागा आहेत. जिथे मागील वेळी 65 टक्के मतदान झाले होते. यामध्ये कॉंग्रेसला 31 जागांवर विजय मिळाला होता, तर भाजपला 23 आणि अन्य पक्षांना 1 जागा मिळाली होती. दक्षिण गुजरात प्रदेशात 35 जागा आहेत, जिथे 2017 मध्ये 70 टक्के मतदान झाले होते. दक्षिण गुजरातमध्ये भाजपला एकूण 27 जागांवर विजय मिळाला होता, तर कॉंग्रेसला 8 जागांवर समाधान मानावे लागले होते.

गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. एकूण 182 जागा असलेल्या राज्यात आज पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबरला होणार आहे. 8 डिसेंबरला निकाल लागणार आहेत.

'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी हे सौराष्ट्र विभागातील द्वारका जिल्ह्यातील खंभलिया मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया सुरतमधील कटारगाममधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.