Sharad Pawar: डिनर डिप्लोमसी... गडकरींसमवेत शरद पवार तर दानवेंसोबत कर्जत-जामखेडचे आमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 03:03 PM2022-04-06T15:03:04+5:302022-04-06T15:39:54+5:30

राज्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा परिचय झाला, असे रोहित पवार यांनी ट्विट करुन म्हटले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांची ११.२५ कोटींची संपत्ती सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) मंगळवारी दुपारी जप्त केली आहे. मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

ईडीची कारवाई मंगळारी दुपारी झाल्यानंतर रात्री राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी उपस्थित होते. तिथे भाजपचेही काही आमदार हजर होते.

विशेष म्हणजे या डिनर डिप्लोमसी सोहळ्यात भाजप नेते व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हेही राऊतांच्या जवळच बसलेले होते. शरद पवारांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय आमदार जमले होते.

उपस्थितांशी संवाद साधताना पवारांनी राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा उल्लेख केला. आज राऊतांकडे ईडीचे पाहुणे येऊन गेले, असं पवार म्हणाले. त्यानंतर त्यांनी माईक राऊतांकडे दिला.

संजय राऊत यांच्याकडे माईक जाताच भाजपच्या आमदारांनी तिथून काढता पाय घेतला. या कार्यक्रमाला भाजपचे १५-१६ आमदार हजर होते.

पवारांच्या निवासस्थानातून निघालेले आमदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या निवासस्थानी पोहोचले. भाजप आमदारांचा हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याचं समजतं.

विशेष म्हणजे रावसाहेब दानवे यांच्यासमेवत आमदार रोहित पवार यांचे फोटो दिसत आहेत. तर, नितीन गडकरी आणि शरद पवार यांचेही फोटो व्हायरल झाले आहेत.

दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्वपक्षीय आमदारांना शरद पवार यांच्या निवासस्थानी जेवणासाठी बोलवण्यात आलं होतं. यावेळी, सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी शरद पवार, नितीन गडकरी आवर्जून उपस्थित होते.

यावेळी राज्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा परिचय झाला, असे रोहित पवार यांनी ट्विट करुन म्हटले. तसेच, अशाप्रकारे चहापाण्याचा कार्यक्रम खासदार संजय राऊत आणि रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानीदेखील घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.