CoronaVirus Updates: देशात नव्या ४६ हजार १४८ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 11:31 AM2021-06-28T11:31:13+5:302021-06-28T11:34:35+5:30

CoronaVirus Updates: गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ९७९ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आले.

देशभरात गेल्या २४ तासांत ४६ हजार १४८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०२ लाख ७९ हजार ३३१ वर पोहचली आहे. देशात सध्या ५ लाख ७२ हजार ९९४ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ९७९ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आले. देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ९६ हजार ७३० वर पोहचली आहे. तसेच देशातील कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९६.८० टक्क्यांवर पोहचलं आहे.

राज्यात रविवारी दिवसभरात कोरोनाच्या ९ हजार ९७४ रुग्णांची नोंद झाली असून, १४३ मृत्यू झाले. सध्या राज्यात एक लाख २२ हजार २५२ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ८ हजार ५६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५७ लाख ९० हजार ११३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९१ टक्के झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी १० लाख ४२ हजार १९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.७१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६ लाख १९ हजार १६८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४ हजार २४० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर २ टक्के आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ३६ हजार ८२१ झाली असून, १ लाख २१ हजार २६८ मृत्यूंची संख्या आहे. दिवसभरात नोंद झालेल्या १४३ मृत्यूंपैकी ८९ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ५४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

मुंबईत बरे झालेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण ९६ टक्के असून २० ते २६ जूनपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर ०.०९ टक्के आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ७२८ दिवसांवर पोहोचला आहे. शहर,उपनगरात ८ हजार ५८२ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत ७४६ रुग्ण आणि १३ मृत्यूंची नोंद झाली आहे. शहर, उपनगरातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख २० हजार ३५६ इतकी असून मृतांचा एकूण आकडा १५ हजार ३९६ झाला आहे. दिवसभरात कोरोनाच्या ३२ हजार ७११ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ७० लाख ४४ हजार ६५८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

दिवसभरात १ हजार २९५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ६ लाख ९४ हजार ८२ रुग्णांनी कोराेनावर मात केली. शहर, उपनगरातील चाळ व झोपडपट्ट्यांमध्ये १२ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ८२ आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील ५ हजार ९९० अतिजोखमीच्या संपर्कांचा शोध घेतला आहे.