CoronaVirus Updates: देशात नव्या 45 हजार 892 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 10:56 AM2021-07-08T10:56:38+5:302021-07-08T11:04:22+5:30

CoronaVirus Updates: देशात सध्या 4 लाख 60 हजार 704 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.

देशभरात गेल्या 24 तासांत 45 हजार 892 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 817 जणांचा मृत्यू झाला आहे. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 07 लाख 09 हजार 557 वर पोहचली आहे. देशात सध्या 4 लाख 60 हजार 704 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 44 हजार 291 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत 2 कोटी 98 लाख 43 हजार 825 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यातील जनतेसाठी काहीसे चिंताजनक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी दिवसभरात राज्यात 09 हजार 558 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत 147 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 8 हजार 899 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण 58 लाख 81 हजार 167 रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर 2.02 टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण 1 लाख 14 हजार 625 आहे.

राज्यात एकूण 4 कोटी 31 लाख 24 हजार 800 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 61 लाख 22 हजार 893 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात 6 लाख 34 हजार 423 जण गृह विलगीकरणात आहेत. तर, 4 हजार 647 जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत बुधवारी दिवसभरात केवळ 664 नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत 744 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

दिवसभरात मुंबईत 9 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 15 हजार 573 इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे 7 हजार 816 उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असून, रुग्णवाढीचा दर 0.08 टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी 844 दिवसांवर गेला आहे.