Coronavirus: ...म्हणून कोरोनाकाळात गंगेमधून मोठ्या प्रमाणात वाहूत येताहेत मृतदेह, समोर आलं कारण

Published: May 11, 2021 05:48 PM2021-05-11T17:48:08+5:302021-05-11T17:54:15+5:30

Coronavirus in India: बिहारमधील बक्सर येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या महादेव घाटावर एकाचवेळी वाहून आलेले ४० मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या घटनेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली.

सध्या देशातील अनेक भागांत कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच मृतांचे प्रमाणही वाढले आहेत. त्याचदरम्यान, बिहारमधील बक्सर येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या महादेव घाटावर एकाचवेळी वाहून आलेले ४० मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या घटनेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. तसेच या प्रकारावरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली होती.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृतदेह वाहून आल्याने जिल्हा प्रशासनालाही धक्का बसला आहे. हे मृतदेह उत्तर प्रदेशमधून वाहत येथे आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृतदेह गंगेमध्ये प्रवाहित करण्यामागे नेमकं काय रहस्य आहे, याची जेव्हा पडताळणी केली गेली तेव्हा एक वेगळीच कहाणी समोर आली आहे.

याबाबत बक्सरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, हे मृतदेह उत्तर प्रदेशमधून वाहून आले आहेत. येथे गंगेच्या एका किनाऱ्यावर बक्सर जिल्हा आहे. तर दुसऱ्या किनाऱ्यावर उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्हा आहे.

महादेव घाटावर क्रियाकर्म करणाऱ्या पंडित दीनदयाल पांडेय यांनी सांगितले की, गंगेमधून वाहून आलेले मृतदेह उत्तर प्रदेशमधून आले आहेत. मात्र येथील लोकही मृतदेह गंगेमध्ये प्रवाहित करतात.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शिव प्रकाश राय यांनी सांगितले की, या परिसरामध्ये मृतदेहाला गंगेत प्रवाहित करण्याची परंपरा शेकडो वर्षे जुनी आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये असे शेकडो गाव आहेत जिथे ही परंपरा चालत आली आहे. मृतदेह गंगेत प्रवाहित केल्यामुळे मनुष्याला मुक्ती मिळते, अशी समजूत आहे. अखेरच्या काळातही शरीर पाण्यात राहणाऱ्यांच्या उपयोगात यावे, अशी यामागची भावना आहे.

मात्र हिंदू परंपरेनुसार बहुतांश अंत्यसंस्कार हे अग्नी देऊन केले जातात. मात्र गंगेच्या किनारी राहणाऱ्यांसाठी गंगेपेक्षा श्रेष्ठ असे काही नाही आहे. त्यामुळे या परिसरात कुठलाही संस्कार हा गंगेशिवाय होत नाही.

शिव प्रकाश राय यांनी पुढे सांगितले की, मोठ्या प्रमाणात मृतदेह मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ही परंपरा जुनीच आहे. मात्र या वेळी मृतांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गंगेमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह मिळत आहेत. सध्या गंगा स्वच्छ करण्यासाठी योजना सुरू आहे. मात्र त्यामध्येही मृतदेह जलप्रवाहित करण्यावर बंधने आणण्याचा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळेच आजही गंगेमध्ये प्रवाहित करण्याची परंपरा आजही सुरू आहे. या प्रकारामुळे जलप्रदूषण होते. तसेच कोरोनाकाळात संसर्गामुळे मृत्यू झालेला असेल आणि असा मृतदेह पाण्यात प्रवाहित केला तर त्याचे परिणाम घातक सिद्ध होऊ शकतात.

दरम्यान, या प्रकारामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. गंगेमध्ये मृतदेह प्रवाहित करण्यास अटकाव करण्यासाठी घाटांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच मृतदेहांवर दहन करून अंत्यसंस्कार केले जावेत, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!