काय सांगता? गटाराच्या पाण्यात पोहोचला कोरोना; भारतीय संशोधकांनी शोधून काढला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 07:32 PM2020-06-09T19:32:31+5:302020-06-09T19:42:54+5:30

कोरोना रुग्णांची संख्या सध्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा २ लाख ६७ हजारांवर पोहोचला आहे.

जगातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिल्यास त्यात भारत सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग पाहता येत्या काही दिवसांत भारत यादीत आणखी वर सरकण्याची दाट शक्यता आहे.

एका बाजूला कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असताना दुसरीकडे भारतीय तंत्रज्ञान संस्थेनं (गांधीनगर) सांडपाण्यातही कोरोनाचे विषाणू शोधले आहेत.

अहमदाबाद शहराच्या बाहेर सोडण्यात आलेल्या गटाराच्या पाण्यात संशोधकांना कोरोना विषाणूची जनुकं आढळून आली आहेत. ही जनुकं संक्रमित नव्हती.

कोरोनाची लागण रोखण्यासाठी संशोधकांनी सांडपाण्याचे नमुने तपासले. त्यावेळी अहमदाबाद शहराच्या बाहेर सोडण्यात आलेल्या गटाराच्या पाण्यात कोरोनाची जनुकं आढळून आली.

भारताच्या आधी नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि अमेरिकेतील सांडपाण्यात सार्स-कोव-२ विषाणूचे कण आढळून आले आहेत.

सांडपाण्यात कोरोनाचा विषाणू आढळतो का, यावर जागतिक पातळीवर संशोधन सुरू आहे. जगातील ५१ प्रतिष्ठीत विद्यापीठ यावर काम करत आहेत. त्यामध्ये आयआयटी गांधीनगरचा समावेश आहे.

भविष्यात कोविड-१९ शी संबंधित धोक्याबद्दल जगाला सतर्क करण्याच्या दृष्टीनं विद्यापीठांचं संशोधन सुरू आहे.

विषाणूची उपस्थिती शोधण्यासाठी सांडपाणी महत्त्वाचा घटक आहे. सांडपाण्याच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होत नसल्याचं आयआयटी गांधीनगरचे प्राध्यापक मनीष कुमार यांनी सांगितलं.

पाण्याचं तापमान अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे विषाणूच्या आयुर्मानावर परिणाम होतो, असं कुमार यांनी सांगितलं.

आयआयटी गांधीनगरनं ८ मे ते २७ मे दरम्यान सांडपाण्याचे नमुने गोळा केले. यामध्ये गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळानं महत्त्वाची भूमिका बजावली.

Read in English