CoronaVirus News : भीषण, भयंकर, भयावह! जगभरात Delta व्हेरिएंटचा हाहाकार; भारत, अमेरिका, ब्रिटनसह 100 देशांमध्ये प्रसार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 02:41 PM2021-07-01T14:41:06+5:302021-07-01T14:55:32+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने तब्बल 18 कोटींचा टप्पा पार केला आहे, तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.

भारतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरातील देशांचं टेन्शन वाढवलं आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढू लागली आहे. आतापर्यंत तब्बल 100 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळल्याची माहिती समोर आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोकादायक असलेला डेल्टा व्हेरिएंट हा सर्वप्रथम फेब्रुवारीमध्ये भारतात आढळून आला आहे. मात्र आता जवळपास 100 देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे.

मूळ कोरोना व्हायरसपेक्षा हा व्हेरिएंट अडीचपटीने अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन, रशिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे बाधितांची संख्या वाढू लागली आहे.

'ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लुएंजा डेटा'ने (GISAID) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार आठवड्यात भारताच्या 224 जीनोम सिक्वेंसिंगमधील 67 टक्के प्रकरणे ही डेल्टा व्हेरिएंटशी संबंधित आहेत. GISAID ही व्हायरसच्या व्हेरिएंट जीनोमला ट्रॅक करत असतात.

78 देशांच्या GISAID आकड्यांचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळले की, भारत, रशिया, ब्रिटन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकासह इतर देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आपली पकड अधिक मजबूत करत आहे.

गेल्या चार आठवड्यांतील (29 जूनपर्यंत) डेटानुसार, ब्रिटन आणि सिंगापूरमध्ये ज्या नमुन्यांची जीनोम सिक्वेसिंग करण्यात आली आहे, त्यातील 90 टक्के प्रकरणे ही कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या साप्ताहिक अहवालात म्हटले की, व्हायरसच्या स्ट्रेनचा वेगाने संसर्ग फैलावत आहे. 29 जून 2021 पर्यंत 96 देशांनी डेल्टा व्हेरिएंट आढळल्याचे कळवले आहे. मात्र, त्याची शक्यता कमी असून डेल्टा व्हेरिएंटची ओळख पटवण्यासाठी आवश्यकता असलेली सिक्वेसिंग क्षमता मर्यादित असल्याचेही WHO ने म्हटले.

डेल्टा व्हेरिएंट बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट हा प्रमुख व्हेरिएंट बनण्याची शक्यता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर इशारा दिला आहे.

WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी Delta Variant हा कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. तसेच हा प्रकार घातक असून निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो असं देखील म्हटलं आहे.

"पहिल्यांदा भारतात आढळून आलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे जगातील जवळपास 85 देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत सापडलेल्या कोरोना व्हेरिएंटमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा प्रकार आहे."

"आपण सर्वांनी सार्वजनिक आरोग्य आणि कोरोनासंदर्भातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. त्यासोबतच या व्हायरलाला रोखायचं असल्यास जगातील सर्वच देशांमध्ये समान पद्धतीने लसींचा पुरवठा व्हायला हवा" असं देखील टेड्रॉस यांनी म्हटलं आहे.

टेड्रॉस यांनी व्यापक लसीकरणाची गरज व्यक्त केली आहे. हे लसीकरण जगातील सर्वच देशांमध्ये व्हायला हवं, अस त्यांनी नमूद केलं. यावेळी श्रीमंत देशांमध्ये होत असलेल्या गर्दीवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली.

"तुम्ही या देशांमध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला गर्दी दिसेल. जणूकाही साथ नाहीच आहे. मग तुम्ही ज्या देशांमध्ये लसींचा पुरवठा पुरेसा झालेला नाही अशा देशांमध्ये जा. तिथे तुम्हाला लॉकडाउन दिसेल" असं टेड्रॉस यांनी सांगितलं.