CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात देशवासियांना मोठा दिलासा! 'ही' आकडेवारी पाहून म्हणाल अरे व्वा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 08:30 AM2020-06-09T08:30:46+5:302020-06-09T08:48:00+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील रुग्णसंख्या 71 लाखांवर गेली, तर मृत्यूच्या संख्येने 4 लाखांचा टप्पा ओलांडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

भारतात लॉकडाऊन उठण्यास सुरुवात झालेली असतानाच देशभरात कोरोनाचे हजारांवर 9 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या 2 लाख 56 हजारांवर गेली.

देशातील मृत्यूची संख्या 7 हजार 200 वर गेली आहे. एकीकडे भारताची ही स्थिती असताना जगभरात दररोज सुमारे 1 लाखावर रुग्ण वाढत आहेत.

जगातील रुग्णसंख्या 71 लाखांवर गेली, तर मृत्यूच्या संख्येने 4 लाखांचा टप्पा ओलांडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

देशातील अनेक लोकांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे. कोरोनावर मात करण्यात ते यशस्वी झाले असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी दहा राज्यांच्या 38 जिल्ह्यांतील डीएम, महापालिका आयुक्त, जिल्हा रुग्णालय अधीक्षक आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली.

महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 1 लाख 24 हजार 430 लोक कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत.

उपचारानंतर निरोगी रूग्णांचे प्रमाण (recovery rate) 48.49% झाला आहे. तर 1 लाख 24 हजार 981 जणांवर उपचार सुरू आहेत.

दाट लोकवस्ती असलेल्या शहरी भागात संक्रमणाचा झपाट्याने प्रसार, घरोघरी सर्वेक्षण करण्याचे महत्त्व, वारंवार तपासणी, वैद्यकीय व्यवस्था आणि कन्टेन्मेंट रणनीती या विषयांवर बैठकीत चर्चा झाली.

आरोग्य मंत्रालयाच्या वतीने अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी सांगितले गेले.

कोरोना नियंत्रणासाठी पायाभूत सुविधा आणि मानव संसाधन व्यवस्थापनाबाबत, आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी पुरेसे नियोजन केले जावे, अशी सूचना केली गेली.

रुग्णांसाठी बेडची उपलब्धता व्यवस्थापित करण्यासाठी देखरेखीसाठी पुरेशी पथके पुरविली पाहिजेत, एक यंत्रणा बसविली पाहिजे, असेही यावेळी सांगण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतातील रुग्णसंख्या अडीच लाखांच्या पलीकडे पोहोचली असतानाच लॉकडाऊनचे नियम शिथिल केले आहेत. त्यातच मागील आठ दिवसांत देशात दररोज 8 ते 9 हजारांनी रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब समजली जाते.

जगात सोमवारी मृत्यूसंख्या 4 लाखांवर गेली. अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. रुग्णसंख्येच्या यादीत भारत आता सहाव्या क्रमांकावर आहे.

जगात 34 लाखांवर लोक बरे झाले. 71 लाखांवरील रुग्णांपैकी 20 लाखांवर रुग्ण एकट्या अमेरिकेत आहेत.