​CoronaVirus News : धोका वाढला! दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट?, पहिल्यांदाच एका दिवसात आढळले 5673 नवे रुग्ण

By सायली शिर्के | Published: October 29, 2020 08:44 AM2020-10-29T08:44:18+5:302020-10-29T09:07:41+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates:

देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 79 लाखांचा टप्पा पार केला आहे. सध्या देशात कोरोनाचा वेग थोडासा मंदावतानाचं चित्र आहे. मात्र या दरम्यान चिंताजनक माहिती समोर आली आहे.

सण-समारंभ समारंभाच्या काळात आणि येत्या हिवाळ्यात देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोना संसर्गाची तिसरी लाट येतेय? असं दिसत आहे. रुग्णांच्या आकडेवारीने हा इशारा दिला आहे.

दिल्लीत बुधवारी पहिल्यांदाच एका दिवसात कोरोना संसर्गाचे तब्बल पाच हजारांहूनही अधिक रुग्ण आढळून आले. दिल्ली, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोना संसर्ग तिसर्‍या टप्प्यात जात आहे, असं निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितलं होतं.

दिल्लीत जुलैमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होऊ लागले होते. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दहा हजारांच्या खाली गेली होती. त्यानंतर कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरू झाली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या महिन्याच्या सुरुवातीस असा दावा केला होता. दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अचानक नवीन प्रकरणांमध्ये होणारी वाढ ही आता चिंता वाढवणार आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण दिल्लीत कोरोना संसर्गाची तिसरी लाट सुरू झाली आहे हे सध्याच्या आकडेवारीवरून दिसून येतं आहे.

दिल्लीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या बुलेटिननुसार बुधवारी राजधानीत कोरोनाचे 5673 नवे रुग्ण आढळले आहेत.

एका दिवसात संसर्ग होण्याची ही आजपर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे. यामुळे दिल्लीत कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 3.7 लाखांवर गेली आहे. तर बुधवारी कोरोनामुळे 40 रुग्णांचा मृत्यू झाला.

दिल्लीत कोरोनामुळे आतापर्यंत 6,396 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र आतापर्यंत देशात एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोना व्हायरससंदर्भात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग सर्वोच्च पातळी गाठून गेला आहे. आता रोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे, यावरून समितीने हा दावा केला आहे.

कोरोनामुळे देशातील फक्त 30 टक्के नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. अशा परिस्थितीत येणारा हिवाळा आणि उत्सवांमध्ये कुठल्याही स्तरावरील निष्काळजी चिंता वाढवू शकते.

कोरोना संदर्भात जारी केलेल्या सुरक्षा नियमांचे आणि मागर्दर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले गेले तर फेब्रुवारी 2021 पर्यंत या देशात कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल असं समितीने म्हटलं आहे.

हिवाळ्यातील थंडीची चाहूल आणि आगामी सणांचा हंगाम पाहता देशात कोरोना संसर्गाची नवी लाट येण्याचा धोका आहे. अशा स्थितीत कुठल्याही स्तरावर दुर्लक्ष करून चालणार नाही, अन्यथा अतिशय बिकट परिस्थिती उद्भवू शकते.

कोरोनासंदर्भात जारी केलेले सुरक्षेचे प्रोटोकॉल आणि इतर निर्बंध पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवावेत, अशी शिफारस समितीने सरकारला केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय केले जात आहेत.

केंद्र सरकारच्या एका विशेष सरकारी समितीने इशारा दिला आहे. सणासुदीच्या काळात कोरोना संदर्भात सतर्कता न बाळगल्यास आणि सूट दिल्यास महिन्याला 26 लाख नवे कोरोना रूग्ण समोर येऊ शकतात असं म्हटलं आहे.