CoronaVirus Live Updates : धोका वाढला! मास्क न लावणं आता महागात पडणार; 'या' राज्यात थेट तुरुंगाची हवा खावी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 16:18 IST2021-03-28T15:58:14+5:302021-03-28T16:18:42+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच दरम्यान देशातील एका राज्यात मास्कबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,19,71,624 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,61,552 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 62,714 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 312 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे.

अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच दरम्यान देशातील एका राज्यात मास्कबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मास्क न लावल्यास आता थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. तेलंगणा सरकारने नागरिकांना मास्क घालणं अनिवार्य केले आहे. मास्कशिवाय फिरताना जर कोणी दिसलं तर त्याला आता तुरुंगात जावं लागण्याची शक्यता आहे.

नियमांचं पालन न केल्यास संबंधित व्यक्तीवर डिजास्टर मॅनेजमेंट अॅक्ट 2005 आणि भारतीय दंड संहितेनुसार कारवाईचे आदेश दिले आहे. सरकारने याबाबतची सूचना कलेक्टर, जिल्हा मॅजिस्ट्रेट, आयुक्त आणि पोलिसांना दिले आहेत.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तेलंगणा सरकार लॉकडाऊन लावण्याच्या विचारात नाही. मात्र काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केलं आहे. तसेच राज्यात लॉकडाऊन लावणार नाही. उद्योगधंदे सुरूच राहतील. त्यामुळे लोकांना घाबरण्याची गरज नाही. मात्र काळजी घ्या असं म्हटलं आहे.

तेलंगणात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरण मोहीम आणखी वेगाने केली जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणात चाचण्याही केल्या जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

एक कोरोना संक्रमित व्यक्ती कोणत्याही निर्बंधाशिवाय 30 दिवसांत सरासरी 406 लोकांना संक्रमित करू शकतो. मे 2020 नंतर कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या साप्ताहिक घटनांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे.

केंद्र सरकारने 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची कोरोनासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. त्याअंतर्गत राज्यांमधील कोरोना तपासणीची संख्या वेगाने वाढविण्यासाठी आणि कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी कडक कारवाई करण्यास सांगितले गेले आहे.

आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक आहे. देशात मागील एका आठवड्यात आढळून आलेल्या प्रकरणांपैकी 59.8 टक्के रुग्ण याच जिल्ह्यांमधील आहेत असं म्हटलं आहे.

कोरोनाच्या संकटात मास्क अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. देशभरात सार्वजनिक ठिकाणी, कार्यक्रमस्थळी आणि वाहतुकीदरम्यान मास्क घालणं हे बंधनकारक करण्यात आलं आहे.

कोरोना व्हायरसबाबत संशोधनातून सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनामुळे दीर्घकाळ आजारी असणाऱ्या रुग्णांनी आजारावर मात केल्यानंतरही त्यांना काही शारीरीक समस्यांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.

















