Corona JN 1: ४१ देशात फैलाव, भारतात नव्या कोरोनाची एन्ट्री; JN 1 ची लक्षणे वाचा, उपायही करा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 09:31 AM2023-12-22T09:31:38+5:302023-12-22T09:35:09+5:30

देशात Covid 19 रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी भारतात ५९४ नवीन कोविड-१९ संसर्गाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यामुळे सक्रिय रुग्ण संख्या २३११ वरून २६६९ वर पोहोचली आहे.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्रालयाने स्क्रीनिंग आणि पाळत ठेवण्याबाबत एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे, सर्व राज्यांना स्क्रीनिंग वाढवण्यास सांगितले आहे, इन्फ्लूएंझा सारख्या गंभीर श्वसन रोगांच्या प्रकरणांची त्वरित नोंद करावी, RT-PCR चाचणी वाढवावी आणि पॉझिटिव्ह नमुन्यांची जीनोम यादी एकत्रित करण्यात सांगितली आहे.

भारतातही कोरोनाच्या सब व्हेरिएंटची सुमारे २१ रुग्ण आढळले आहेत. या नवीन व्हेरिएंटचे नाव JN.1 असे आहे. हा व्हेरिएंट इतर देशांमध्येही वेगाने पसरत आहे, त्यामुळे त्याचा झपाट्याने वाढणारा प्रसार लक्षात घेऊन WHO ने JN.1 ला "व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट" (VOI) यादीत टाकलं आहे.

WHO नुसार JN.1 सब व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते, विशेषतः ज्या देशांमध्ये हिवाळा अधिक तीव्र असतो.JN 1 सब व्हेरिएंट आतापर्यंत ४१ देशात पसरला आहे. त्यात फ्रान्स, संयुक्त राज्य अमेरिका, सिंगापूर, कॅनडा, ब्रिटन, स्वीडन यांचा समावेश आहे.हा नवीन व्हेरिएंट किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे काय याबाबत जाणून घेऊ.

JN.1 या सब व्हेरिएंट पहिल्यांदा ऑगस्टमध्ये समोर आला. हे ओमिक्रॉनच्या BA.2.86 पासून बनलेला आहे, २०२२ च्या सुरुवातीला ओमिक्रॉनच्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली. हा व्हेरिएंट व्यापकरित्या पसरला नाही. परंतु JN 1 हा ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट असून तो मजबूत इम्युनिटी असलेल्या लोकांनाही सहजपणे संक्रमित करू शकतो.

कोरोनाच्या JN 1 व्हेरिएंटची लक्षणे काय? - नाक वाहणे, ताप, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, मळमळ, उलटी, थंडी वाजणे अशा प्रकारची लक्षण नव्या रुग्णांमधून आढळली आहे.

व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी काय कराल? कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता लोकांनी जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. त्याचसोबत मास्क लावणे गरजेचा आहे. खोकला किंवा शिंकताना रुमालाने नाक झाकावे आणि हात स्वच्छ धुवावेत.

धोका किती? आरोग्य तज्ज्ञ चंद्रकांत लहरिया यांनी सांगितल्यानुसार, भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटसह अनेक सब व्हेरिएंटच्या संपर्कात लोक आलेले आहेत. भारतीय लोकांना कोविडच्या लसीचे किमान २ डोस देण्यात आले.काहींनी बुस्टर डोसही घेतले आहेत. त्यामुळे कोविडच्या कुठल्याही व्हेरिएंट अथवा सब व्हेरिएंटपासून गंभीर आजार होण्याची जोखीम कमी आहे असं ते म्हणाले.

सध्या महाराष्ट्रात ६३ हजार विलगीकरण बेड्स, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स, ९ हजार ५०० आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे ४५ रुग्ण (मुंबई-२७, पुणे-८, ठाणे-८,कोल्हापूर-१, रायगड-१) आढळून आले असल्याची माहिती सरकारने दिली.

मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन - मागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील यंत्रणा संपूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करुन घ्यावी. आगामी सण व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार यासाठी काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी लोकांना केले.