रेंज रोवर, BMW... 2018 मध्ये 34 कोटी, आता 350 कोटी; काँग्रेस नेत्याच्या संपत्तीचा 'सुपर स्पीड'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 02:48 PM2023-12-11T14:48:27+5:302023-12-11T14:56:18+5:30

Dhiraj Sahu : धीरज प्रसाद साहू 2018 मध्ये झारखंडमधून काँग्रेसचे राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले.

वाढत्या संपत्तीच्या बाबतीत काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांचा वेग रॉकेटपेक्षाही जास्त आहे. ओडिशा आणि झारखंडमधील त्याच्या घरातून 350 कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त करण्यात आली आहे.

बेहिशेबी रोकड मोजण्यासाठी आणलेल्या नोटा मोजण्याच्या मशीन्स देखील बंद पडत आहेत. आयकर विभाग तीन दिवसांपासून त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या रोखीची मोजणी करत असून, रकमेचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.

धीरज प्रसाद साहू 2018 मध्ये झारखंडमधून काँग्रेसचे राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले होते की, त्यांच्याकडे 34 कोटी रुपयांची संपत्ती आहे आणि आता त्यांची संपत्ती इतकी वाढली आहे की चलनी नोटांचे बंडल कपाटात मोठ्या प्रमाणात सापडले आहेत.

साहू यांच्याकडे या पैशांचा हिशोब नाही. यावर काँग्रेसने त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागितलं आहे. 2018 मध्ये, धीरज प्रसाद साहू यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की त्यांच्याकडे 34 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 14.43 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, ज्यात शेतजमीन आणि मालमत्तेचा समावेश आहे.

मालमत्तेच्या तपशीलात मोठ्या आणि महागड्या वाहनांचाही उल्लेख केला होता. याशिवाय त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 कोटी रुपये आहे आणि त्यांच्या पत्नीकडे 94.5 लाख रुपयांचे 3.1 किलो सोन्याचे दागिने आहेत. त्याचवेळी धीरज साहू यांच्याकडे 26.2 लाख रुपयांचे हिरे जडलेले दागिने आहेत.

2018 मध्ये आपल्या प्रतिज्ञापत्रात धीरज प्रसाद साहू यांनी सांगितलं होतं की, त्यांच्याकडे रेंज रोवर, बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर आणि पजेरो सारख्या लक्झरी आणि महागड्या गाड्या आहेत.

प्रतिज्ञापत्रानुसार, धीरज साहू यांनी त्यांची कौटुंबिक कंपनी बलदेव शिवप्रसाद साहूमध्ये 2.5 कोटी रुपये आणि बलदेव साहू अँड सन्समध्ये 2 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

काँग्रेस खासदाराच्या कुटुंबाच्या मालकीच्या ओडिशा-आधारित डिस्टिलरी कंपनीविरुद्ध आयकर विभागाच्या छाप्यात जप्त केलेली रोकड पाच दिवसांच्या मोजणीनंतर 351 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. 6 डिसेंबर रोजी विभागाने छापेमारी सुरू केली होती.