भारतातल्या चिनी कंपनीने भूमिपुत्रांनाच कामावरून काढलं; कारण विचारताच 'गो मोदी' म्हटलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 08:06 PM2020-06-22T20:06:14+5:302020-06-22T20:40:48+5:30

भारत सरकारची मॅंगनीज ओर इंडिया लिमिटेड(मॉयल लिमिटेड)च्या अंतर्गत मध्य प्रदेशमधील बालाघाटमध्ये कार्यरत असणारी चीनची कंपनी चायना कोल- ३ वर कडक कारवाई केली आहे. चीनच्या या कंपनीवर भारतीय मजूरांना कामावर न घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर कंपनीचे काम बंद करण्याचे आदेश दिले आहे.

चीनबरोबर सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, चीनची कंपनी चीन कोल- 3 ने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे कारण देत भारतीय मजुरांना कामावरुन काढून टाकले होते. यानंतर कंपनीच्या विरोधात कामगारांनी आंदोलन देखील केले होते.

चिनी कंपनीला मॉयल लिमिटेडने दिलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट लिहिण्यात आले आहे की, जोपर्यत कंपनी भारतीय कामगारांना पुन्हा कंपनीत काम देत नाही, तोपर्यत तुमची कंपनी भारतात काम करु शकत नाही.

कंपनीतून काढण्यात आलेले कामगार मार्च २०१९ पासून कंपनीत कार्यरत होते.

लॉकडाऊनच्या दरम्यान या कंपनीचे काम देखील बंद करण्यात आले होते. मात्र दहा दिवसांपूर्वीच या कंपनीचे काम पुन्हा सुरु करण्यात आले आहे. परंतु पूर्वीपासून काम करणारे ६२ भारतीय मजदूरांना कामावर घेण्यात आले नाही.

कंपनीच्या या भूमिकेनंतर कामगारांनी कंपनीच्या विरोधात आंदोलन केले. कंपनीच्या सरकारी अधिकाऱ्यांनी कामगारांनी काढून टाकण्याबाबत चर्चा केली. मात्र भारतीय मजूरांसोबत काम करण्यास आम्ही तयार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोनाचं कारण पुढे करत चिनी कंपनी भारतीय कामगारांना मुद्दाम काढत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या ४० चिनी कामगारांसोबत कंपनीमध्ये काम सुरु केले होते.

या कंपनीमध्ये काम करणारे कामगार विजय तांदे यांनी याबाबत सांगितले की, आम्ही एक वर्षापासून या कंपनीत काम करत आहोत. मात्र काही दिवसांपूर्वी आम्हाला कोणतीही कल्पना न देता कंपनीतून काढून टाकले आहे. तसेच आम्ही कंपनीत काम मागण्यासाठी गेल्यास आम्हाला 'गो मोदी' असं बोलतात, असा खुलासा विजय तांदे यांनी केला आहे.

मॉयलचे अधिकारी उम्मेद भाटी यांनी सांगितले की, चिनी कंपनी सीमेवरुन सुरु असलेल्या संघर्षामुळे भारतीय मजदूरांना कंपनीत घेत नाही. आम्ही कंपनीला अनेकवेळा सूचना केल्या मात्र तरीदेखील कंपनीने भारतीय कामगारांनी कामावर घेण्यास नकार दिल्यामुळे आम्ही कंपनी बंद करण्याचे आदेश दिले, असं उम्मेद भाटी यांनी स्पष्ट केले आहे.