India China FaceOff: विश्वासघातकी चीनचा पुन्हा बुरखा फाटला; भारताविरुद्धच्या कारवायांचा ‘हा’ घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 04:58 PM2020-06-25T16:58:17+5:302020-06-25T17:02:07+5:30

एकीकडे सीमेवरचा तणाव कमी करण्यासाठी चीन भारताशी मुत्सद्दी व लष्करी चर्चा करीत आहे आणि दुसरीकडे चीनने पूर्व लडाखमध्ये पांगोंग सो, गलवान खोरे आणि इतर भागात सैन्याची संख्या वाढवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चीनने गलवान खोऱ्यातही सैनिकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.

सॅटेलाईन फोटोमधून आता याबाबत खुलासा झाला आहे. १५ जून रोजी भारतीय आणि चिनी सैन्यात ज्या ठिकाणी रक्तरंजित संघर्ष झाला त्या ठिकाणी मोठ्या संख्येने चिनी कॅम्प उभारण्यात आल्याची माहिती सॅटेलाईट इमेजद्वारे समोर आली आहे.

भारताचा तीव्र विरोध असूनही चिनी सैन्याने पुन्हा एकदा पेट्रोलिंग पॉईंट १४ च्या आसपास काही वास्तू उभारल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून चीनने गलवानवर दावा केला होता, जो भारताने नाकारला आहे. पांगोंग सो आणि गलवान खोरे व्यतिरिक्त डेमचॉक, गोगरा हॉट स्प्रिंग आणि दौलत बेग ओल्डी येथेही दोन्ही सैन्य आमने-सामने आहेत.

पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ १५ जून रोजी झालेल्या हिंसाचारानंतर ही पोस्ट चीनने रिकामी केली होती. येथे केवळ थोड्या संख्येने चिनी सैनिक तैनात होते. दरम्यान, चीनने पुन्हा एकदा चर्चेच्या आडून या पोस्टवर आपल्या सैन्यांची संख्या वाढविली आहे. एवढेच नाही तर चीननेही या पोस्टवर अवजड वाहने आणण्यासाठी रस्ता तयार केला आहे

पेट्रोलिंग पॉईंट १४ वर पोहोचण्यासाठी चीनने रस्ताही बांधला आहे. नदीच्या काठावरच्या प्रवाहात अडथळा आणत चीनने रस्ता तयार केल्याचं सॅटेलाईट इमेजमधून स्पष्ट दिसत आहे. या रस्त्याच्या कडेला चिनी सैन्याच्या अनेक चौकीही दिसतात. त्याचबरोबर चीनची अवजड यंत्रसामग्रीदेखील दिसते.

सूत्रांच्या माहितीनुसार, गलवान खोरे आणि पांगोग सो नंतर आता दौलत बेग ओल्डी येथे चीन भारतीय सैन्याला गस्त घालण्यास अडथळा आणत आहे. दौलत बेग ओल्डी आणि डेस्पांग सेक्टरजवळ चीनने आपले तंबू टाकले आहेत. चिनी सैन्याच्या तळावर हालचाली वाढल्या आहेत. जूनच्या सॅटेलाईट फोटोमध्ये हे उघड झाले आहे. चीनच्या कोणत्याही धाडसाला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने तेथील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.

अमेरिकेच्या अंतराळ तंत्रज्ञान कंपनी मॅक्सार टेक्नॉलॉजीजच्या सॅटेलाईट फोटोंमधून असे दिसून आले आहे की, चीनचे सैन्य गलवान खोऱ्यातून मागे हटले नाहीत. १५ जून रोजी दोन्ही सैन्यामध्ये हिंसक चकमक झाली. काराकोरम पासजवळील भागातही चीनला घुसखोरी करायची आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे. धोरणात्मक दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचे आहे.

पेंगोंग सो आणि गलवान व्हॅली व्यतिरिक्त पूर्व लडाखमधील डेमचोक, गोगरा हॉट स्प्रिंग आणि दौलत बेग ओल्डी येथेही दोन देशांच्या सैन्यांदरम्यानची रणधुमाळी सुरूच आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवरून चिनी सैन्य भारताच्या दिशेने आलं होतं, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि उत्तराखंडमधील वास्तविक नियंत्रण रेषेत अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर चीनने सैन्य आणि शस्त्रे दोन्ही वाढविली आहेत.

जेव्हा दोन्ही देशांमधील सैन्य आणि मुत्सद्दी चर्चा चालू असतात तेव्हा अशा वेळी चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील लष्करी संख्याबळ वाढवत आहे. सोमवारी दोन्ही देशांच्या सैन्याच्या वरिष्ठ कमांडरांची भेट झाली. सुमारे एक तास चाललेल्या या वेळी दोन्ही बाजूंनी एकमत झाले की ते पूर्व लडाखमधील सर्व संघर्ष पॉईंटवरील तणाव हळूहळू कमी करतील. बुधवारी दोन्ही बाजूंनी राजनैतिक चर्चादेखील केली.

परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचि (पूर्व आशिया) नवीन श्रीवास्तव आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील डीडी वू जियांगहाओ यांच्यात बुधवारी चर्चा झाली होती. या चर्चेमध्ये दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पालन करावे आणि त्याचा सन्मान करावा असे निश्चित झाले होते. तत्पूर्वी २२ जून रोजी भारताच्या १४ कॉर्प्सचे कमांडर लेफ्टिनंट हरिंदर सिंह आणि तिबेट मिलिट्री डिस्ट्रिक्टचे कमांडर मेजर जनरल लियू लिन यांच्या ११ तास मॅरथॉन बैठक पार पडली होती.

Read in English