चंद्रयान चंद्रावर थेट उतरणार नाही! ५-६ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घालणार, मग सुर्याची वाट पाहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 04:09 PM2023-07-14T16:09:14+5:302023-07-14T18:24:50+5:30

थोडा जरी विलंब झाला तरी...; चंद्रयान बाहुबलीपासून वेगळे झाले... पुढचा प्रवास बिकट, तेवढाच रोमांचक

श्रीहरिकोटट्यातून आज दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास चंद्रयान ३ आकाश चिरत अंतराळात झेपावले. या यानाला ताकद बाहुबलीची आहे. बाहुबली रॉकेट चंद्रयानाला आपल्या पाठीवर घेऊन निघाले आहे खरे परंतू ते चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण रस्त्यात साथ देणार नाहीय.

अंतराळात ठरावीक अंतर कापल्यानंतर रॉकेट चंद्रयान ३ पासून वेगळे होईल. यानंतर चंद्रयानाला एकट्यालाच पुढचा प्रवास करावा लागणार आहे. वैज्ञानिकांचा फॅट बॉय म्हणजेच बाहुबली तिथून माघारी फिरेल. मग चंद्रयानाला आधी पृथ्वीला प्रदक्षिणा घालाव्या लागतील, नंतर सुर्याची वाट पाहत थांबावे लागणार आहे.

चंद्रावर उतरण्यासाठी चंद्रयानाला सुर्याची मदत लागणार आहे. 615 कोटी रुपयांचा हा प्रकल्प सुर्याच्या दर्शनाने सफल होणार आहे. बाहुबली चंद्रयानाले घेऊन तर झेपावला पण पुढे काय काय होणार आहे...

वैज्ञानिकांनुसार चंद्रयानाचे स्पेसक्राफ्ट उड्डाणानंतर १६ मिनिटांनी बाहुबलीपासून वेगळे झाले आहे. तेव्हा त्याची उंची १७९ किमी होती. आता हे यान १७० किमीच्या उंचीवरून पृथ्वीला अंडाकार मार्गाने ५ ते ६ वेळा पृथ्वीला घिरट्या घालणार आहे.

गोल गोल फिरत असताना चंद्रयान त्याच्या वेगात आल्यानंतर एक महिन्याच्या प्रवासाला निघणार आहे. लाखो किमींचे अंतर यानाला पार करायचे आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चंद्रयान पृष्ठभागापासून १०० किमी अंतरावर जाऊन थांबणार आहे.

चंद्रयानाला 3.84 लाख किमीचे अंतर पार करावे लागणार आहे. लँडर २३-२४ ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. परंतू, तिथे लँडरला एक निर्णय घ्यावा लागणार आहे. चंद्राच्या दक्षिण भागात उतरण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याला सुर्याची वाट पहावी लागणार आहे.

प्रज्ञान रोव्हरसह विक्रम हे लँडर चंद्राच्या जवळ पोहोचल्यावर सुर्यप्रकाशात उतरण्याचा प्रयत्न करेल. चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो. या काळात रोव्हर चंद्रावर आपले काम पूर्ण करेल. अनेक कॅमेऱ्यांद्वारे तो इस्रोला छायाचित्रेही पाठवणार आहे.

चंद्रावर उतरण्याची तारीखही बदलू शकते. हे चंद्रावरील सूर्योदयाच्या वेळेवर अवलंबून असेल. जर कोणत्याही कारणाने विलंब झालाच तर पुन्हा सप्टेंबरमध्ये चंद्रयानाला संधी मिळणार आहे, असे इस्त्रोच्या प्रमुख्यांनी स्पष्ट केले आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नेहमी अंधार असल्याने या भागात पाणी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 22 जुलै 2019 रोजी चांद्रयान-2 लाँच करण्यात आले होते. जुलै महिन्यात पृथ्वी आणि चंद्र तुलनेने जवळ असतात. चंद्राचे स्वतःचे गुरुत्वाकर्षण आहे. पृथ्वीच्या तुलनेत ते सुमारे 1/6 आहे. चंद्र मोहिमेत त्याची महत्त्वाची भूमिका असणार आहे.