Oil Price: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना गिफ्ट; खाद्यतेलाच्या किंमतीत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 12:29 PM2021-10-14T12:29:17+5:302021-10-14T12:34:05+5:30

palm, soy, sunflower oil price changes: महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडं मोडलं आहे. त्यात सणासुदीच्या काळात केंद्राने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचं आर्थिक कंबरडं मोडलं आहे. यातच दिवाळी जवळ आल्यानं अनेकांना चिंता लागून राहिली आहे. सण-उत्सव कसा साजरा करायचा हा मोठा प्रश्न लोकांना पडला आहे. हे पाहता केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी एक मोठं पाऊल उचलले आहे.

सरकारने पाम आणि सूर्यफूल तेलावरील(Sunflower Oil) कृषी उपकर(Agri Cess) आणि कस्टम ड्यूटी (Custom Duty) कमी केली आहे. यापूर्वी, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने तेल आणि तेलबियांवर स्टॉक मर्यादा लादण्याचा आदेश जारी केला होता.

साठा मर्यादा ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू राहील. राज्यांना आदेश जारी करण्यास आणि त्याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. सरकारच्या या निर्णयानुसार, कच्च्या पाम तेलावरील शुल्क कपात 8.25% (आधी 24.75%), आरबीडी पामोलिन 19.25 (आधी 35.75), आरबीडी पाम तेलावर 19.25 (आधी 35.75) करण्यात आले आहे.

क्रूड सोया तेल 5.5 (आधी 24.75), रिफाइंड सोया तेल 19.5 (आधी 35.75), कच्चे सूर्यफूल तेल 5.5 (आधी 24.75) आणि रिफाइंड सूर्यफूल तेल 19.25 (आधी 35.75) पर्यंत कमी करण्यात आले. शुल्क कमी केल्यामुळे, सीपीओच्या किमतीत 14,114.27 रुपयांनी, आरबीडी 14526.45 रुपयांनी, सोया तेल 19351.95 रुपये प्रति टन कमी झाले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर खाद्य तेलात १५ रुपयांची कपात होऊ शकते.

निर्णय केव्हा अंमलात येईल - केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) अधिसूचनेत म्हटले आहे की, १४ ऑक्टोबरपासून शुल्कात कपात लागू होईल आणि ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू राहील.

गेल्या महिन्यात ११ सप्टेंबर रोजी पाम तेल, सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क कमी करण्यात आले होते. तर कच्च्या पाम तेलावरील मूलभूत आयात शुल्क १० टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्यात आले. त्याचबरोबर कच्च्या सोया तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कही 7.5 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्यात आले.

भारतात पाम तेल आयात करण्याचा नवा रेकॉर्ड सप्टेंबरमध्ये बनला आहे. सप्टेंबर महिन्यात १६.९८ लाख टन पाम तेल आयात करण्यात आले. त्याआधी ऑक्टोबर २०१५ मध्ये भारतात १६.५१ लाख टन आयात केले होते. १९९६ पासून भारतात पाम तेल आयात करण्याची सुरुवात झाली आहे.