मोठी बातमी! पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत; रेल्वे गाड्यांना लक्ष्य करण्याचा कट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 09:18 PM2021-07-13T21:18:37+5:302021-07-13T21:23:20+5:30

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या रडारवर भारतीय रेल्वे; गर्दी असलेल्या गाड्यांना लक्ष्य करण्याची तयारी

उत्तर प्रदेशच्या लखनऊमधून दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयनं मोठा कट आखला आहे.

स्वातंत्र्य दिनी किंवा त्याच्या आसपास लखनऊसह महत्त्वाच्या शहरांमध्ये घातपाती कारवाया घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना दोनच दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आलं. यानंतर आता आयएसआयचा आणखी एक प्लान समोर आला आहे.

बिहार आणि उत्तर प्रदेशला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आयएसआयच्या निशाण्यावर आहेत. या गाड्यांमधून मोठ्या संख्येनं मजूर प्रवास करतात. या ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळेच या गाड्यांना लक्ष्य करण्याचा प्लान आयएसआयकडून आखण्यात आला आहे.

अधिकाधिक जीवितहानी व्हावी यासाठी लांब पल्ल्याच्या आणि अधिक प्रवासी असलेल्या गाड्यांमध्ये टायमरच्या मदतीनं ब्लॉम्ब स्फोट घडवून आणण्याची योजना आयएसआयनं आखली आहे. रेल्वे पोलिसांच्या एका विभागीय पत्राच्या आधारे दैनिक भास्करनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

आयएसआयनं घातपाती कारवाया करण्यासाठी केलेल्या कटाची माहिती रेल्वे पोलिसांच्या एका विभागीय पत्रात आहे. या पत्रामुळे रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे.

१७ जूनला दरभंगा रेल्वे स्थानकात एका पार्सलचा स्फोट झाला. त्यानंतर बिहार पोलीस आणि इतर तपास यंत्रणांनी तपास केला. त्यातून चालत्या रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट घडवण्याच्या योजनेची माहिती पुढे आली.

पाकिस्तानच्या आयएसआयनं पंजाबमधील आपल्या स्लीपर सेलला टायमरसोबत एक बॉम्ब देण्यास सांगितल्याचा उल्लेख बिहारमधील रेल्वे पोलिसांना मिळालेल्या पत्रात आहे. तारा जोडा आणि तयार बॉम्ब ट्रेनमध्ये लावा, अशा सूचना पत्रातून देण्यात आल्या आहेत.

बिहार आणि उत्तर प्रदेश ये-जा करत असलेल्या ट्रेनमध्ये बॉम्ब लावा. मजुरांना लक्ष्य करून कायदा सुव्यवस्था बिघडवता येईल, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

बिहार रेल्वे पोलिसांच्या हाती लागलेल्या पत्राची माहिती रेल्वेच्या एसपी, एचडीपीओ, एसएचओंना पाठवण्यात आली आहे. सर्वांना सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.