एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:22 IST2025-11-20T13:10:20+5:302025-11-20T13:22:01+5:30

बिहार निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा जेडीयू यांच्या एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले. आता नितीश कुमार यांच्या नेतृत्वात नवीन सरकारची स्थापना झाली आहे. पटना येथील गांधी मैदानात नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह एनडीएमधील २६ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. या मंत्रिमंडळात भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून २ जणांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यात सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांचा समावेश आहे.

भाजपाच्या कोट्यातून १४ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात सर्वाधिक चर्चा आंतरराष्ट्रीय शूटर श्रेयसी सिंह यांची होत आहे. जमुई विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा त्यांचा विजय झाला. श्रेयसी यांनी ५४ हजार ४९८ मतांनी आरजेडीचे उमेदवार मोहम्मद शमशाद आलम यांना मात दिली.

श्रेयसी यांना एकूण १ लाख २३ हजार ८६८ मते पडली होती, तर शमशाद आलम यांना ६९ हजार ३७० मते पडली. ३४ वर्षीय श्रेयसी सिंह पहिल्यांदा २०२० साली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर मैदानात उतरल्या होत्या. श्रेयसी माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे दिग्गज दिवंगत नेते दिग्विजय सिंह यांची मुलगी आहे. त्याशिवाय श्रेयसी यांची आई पुतुल सिंह यादेखील बांका मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.

श्रेयसी यांनी २०२० च्या निवडणुकीत पहिल्यांदा विजय मिळवला. त्यावेळी आरजेडीचे उमेदवार विजय प्रकाश यांना ४१ हजार ४९ मतांनी पराभूत केले. त्यावेळी श्रेयसी सिंह यांना ७९ हजार ६०३ मते पडली तर आरजेडी उमेदवाराला ३८ हजार ५५४ मते पडली होती.

कोण आहे श्रेयसी सिंह? - ३४ वर्षीय श्रेयसीने पॅरिस ऑलिंपिकमध्ये शॉटगन ट्रॅप (महिला) स्पर्धेत भाग घेतला होता, जिथे ती पात्रता फेरीतच बाहेर पडली. २०१४ च्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने शॉटगन ट्रॅप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. २०१४ च्या इंचॉन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने शगुन चौधरी आणि वर्षा वर्मन यांच्यासोबत डबल ट्रॅप सांघिक स्पर्धेत कांस्यपदकही जिंकले.

२०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये श्रेयसीने सुवर्णपदकही जिंकले. २०१८ मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकूणच श्रेयसीने तिच्या नेमबाजीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे.

श्रेयसीने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे, २०१४ च्या इंचॉन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने डबल ट्रॅप सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेच नाही तर अनेक स्पर्धा आणि चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्यांचे वर्चस्व आणखी प्रभावी होते, त्यांनी २०१२ मध्ये पटियाला, २०१४ मध्ये अल-ऐन आणि २०१६ मध्ये अबू धाबी येथे झालेल्या ट्रॅप टीम इव्हेंटमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली. २०११ मध्ये क्वालालंपूर, २०१३ मध्ये अल्माटी आणि २०२४ मध्ये कुवेत सिटी येथे झालेल्या ट्रॅप टीम इव्हेंटमध्येही रौप्य पदके जिंकली.

त्यांनी कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये दोन रौप्य पदके जिंकली आहेत, २०१० मध्ये दिल्लीतील ट्रॅपमध्ये आणि २०१७ मध्ये ब्रिस्बेनमधील डबल ट्रॅपमध्ये ही कामगिरी केली. गेल्या काही वर्षांत भारताच्या सर्वात विश्वासार्ह आणि सातत्यपूर्ण नेमबाजांपैकी एक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.

















