Aditya Thackeray: नितीशकुमारांसोबत आजोबांच्या आठवणी, तेजस्वींना भेट दिली छत्रपतींची मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 08:10 PM2022-11-23T20:10:49+5:302022-11-23T20:42:16+5:30

युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे एक दिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते. आदित्य ठाकरेंसोबतशिवसेना खासदार अनिल देसाई, प्रियंका चर्तुवेदी हेदेखील उपस्थित होते.

युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे एक दिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते. आदित्य ठाकरेंसोबतशिवसेना खासदार अनिल देसाई, प्रियंका चर्तुवेदी हेदेखील उपस्थित होते.

पटना येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सध्याच्या विविध विषयांवर चर्चा झाली. नितीशजी वापरत असलेली इलेक्ट्रिक गाडी, पर्यावरण यावरही चर्चा झाली. स्व.बाळासाहेब व उद्धवसाहेबांशी नितीशजींचे जुने संबंध आहेत, त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, असेही आदित्य यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यामुळे आगामी पालिका निवडणुकीची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे बिहारला पोहचताच पटना येथे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरी पोहचले. तेव्हा आदित्य यांच्या स्वागतासाठी तेजस्वी यादव स्वत: बाहेर उभे होते.

आदित्य ठाकरेंची गाडी पोहचल्यानंतर हे दोन्ही नेते आमनेसामने आले. तेव्हा आदित्य यांनी कैसे हो असा प्रश्न तेजस्वी यादवांना केला. तेव्हा तेजस्वी यादव यांनी Very Well, Welcome म्हणत त्यांना घरात घेऊन गेले. त्याठिकाणी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

पहिल्यांदाच तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे भेटणार त्यामुळे याठिकाणी माध्यमांचीही बरीच गर्दी होती. तर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही आदित्य ठाकरेंनी भेट घेतली.

आदित्य ठाकरेंच्या डावीकडे बिहारचे मुख्यमंत्री आणि उजवीकडे उपमुख्यमंत्री असा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. आदित्य यांच्या स्वागताला बिहारचे दोन्ही दिग्गज आवर्जून उपस्थित होते, तसेच कार्यकर्तेही होते.

या बैठकीनंतर आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलले की, आम्ही एकमेकांशी फोनवरून संपर्कात होतो. कोविड असल्याने आमची भेट झाली नाही. बिहारमध्ये प्रगती होताना दिसतेय. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात चांगले काम सुरू आहे.

देशातील महागाई, रोजगार याविरोधात तरुणांनी एकटवलं पाहिजे. सर्वांनी एकत्र काम केले तर देशात काहीतरी चांगले घडेल. भेट होणं महत्त्वाचं होतं. आमचे कौटुंबिक संबंध होते. ही मैत्री यापुढेही कायम राहील. या प्रसंगी आदित्य यांनी छत्रपती शिवरायांची मूर्ती तेजस्वींना भेट दिली.

तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांच्या मदतीनं राजकीय परिवर्तन केलंय. अशा तरूण नेत्यांना भेटून देशात मजबूत फळी उभारण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करतायेत. त्यात त्यांना यश मिळतंय, असेही आदित्य यांनी म्हटले.