तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 02:12 PM2021-08-16T14:12:29+5:302021-08-16T14:20:48+5:30

काबुलला गेलेले Air India चे विमान सुरक्षितपणे १२४ प्रवाशांना घेऊन भारतात परतले आणि अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मायदेशी आणण्यासाठी पाठवण्यात आलेले एअर इंडियाचे विमान (Air India) रविवारी रात्री सुरक्षित दिल्ली विमानतळावर पोहोचले. अफगाणिस्तानमधील बहुतांश भागांवर पुन्हा एकदा तालिबानने नियंत्रण मिळवले आहे.

दुसरीकडे अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही देश सोडला आहे. अशा परिस्थितीत एअर इंडियाचे विमान AI243 हे प्रवाशांना घेऊन भारतात परतले आहे. मात्र, यावेळी वेगळाच थरार घडल्याचे सांगितले जात आहे.

तालिबानी दहशतवादी संघटनेने काबुल ताब्यात घेतले असताना त्या शहरातील भारतीय नागरिकांना सुखरुपपणे परत आणण्यासाठी भारताने प्रयत्न सुरु केले होते. तिथे फसलेल्या जवळपास १२४ भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या AI243 या शेवटच्या विमानाने रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान उड्डान केलं. त्यासाठी पाकिस्तानच्या हवाई मार्गाचा वापर करण्यात आला.

एअर इंडियाचे विमान काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले पण त्याला लॅन्डिंगची परवानगी देण्यात येत नव्हती. एक वेळ अशी आली की, आता एअर इंडियाचे विमान काबुल विमानतळावर उतरु शकेल की नाही, याबाबत शंका उपस्थित झाली. त्यामुळे त्या विमानाला आकाशात जवळपास १२ चकरा माराव्या लागल्या. या दरम्यान विमानातील इंधन संपण्याचा धोका निर्माण झाला होता.

तशा स्थितीत जर विमान काबुल विमानतळावर उतरवण्यात आले आणि जर विमानतळावर तालिबान्यांचे नियंत्रण आले असते तर मदतीसाठी गेलेल्या भारतीय विमानाचे अपहरण होण्याचा जास्त धोका होता. मात्र, हवेत १२ फेऱ्या मारल्यानंतर सर्वकाही सुरक्षित असल्याचं समजल्यानंतर शेवटी एअर इंडियाच्या त्या विमानाला लॅन्डिंगची परवानगी देण्यात आली.

एअर इंडियाचे हे विमान भारतीयांच्या मदतीसाठी गेलेले शेवटचे विमान होते. अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या मदतीने लष्कर-ए-तोयबा आणि भारतात सक्रिय असलेल्या इतर दहशतवादी संघटना या कंदहारमधील भारतीय दूतावासाला लक्ष्य करु शकतात अशी शक्यता गुप्तचर खात्याने वर्तवली होती.

या आधीच भारताने आपल्या दूतावासातील अधिकाऱ्यांना विशेष विमानाने सुरक्षित भारतात आणले आहे. अफगाणिस्तानच्या अनेक भागात प्रचंड हिंसाचार पाहता या आधीच व्यावसायिक उड्डाणे बंद करण्यात आली होती. देशातील व्यावसायिक विमान उड्डान बंद होण्याआधी भारतात निघून या असा सल्ला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना दिला होता.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने तयारी सुरू केली. मात्र या मोहिमेला धक्का बसला आहे. अफगाणिस्तानची हवाई हद्द बंद असल्याने तिथे विमाने उतरवली जाऊ शकत नाही. त्यामुळे काबुलला जाणारी विमाने रद्द करण्यात आल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.

एअर इंडियाचे विमान रात्री ८.३० ऐवजी १२.३० वाजता काबुलसाठी उड्डाण करणार होतं. मात्र आता हवाई हद्दच बंद असल्याने विमान उड्डाण करू शकणार नसल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांच्या एअरलिफ्टला विलंब होणार आहे.

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसागणिक बिघडत चालली आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. तालिबानच्या वर्चस्वामुळे अफगाणिस्तानमध्ये असलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी हमी तालिबानने दिली आहे.

मात्र भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडियाने दोन विमाने स्टँडबायवर ठेवली आहेत. केंद्राचे आदेश मिळताच ही विमाने दिल्लीहून उड्डाण करतील आणि काबुलमध्ये उतरतील. सध्या काबुलचा विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात आहे.

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी दोन विमाने सज्ज ठेवण्याच्या सूचना मोदी सरकारकडून एअर इंडियाला देण्यात आल्या आहेत. काबुलच्या दिशेने झेपावण्यास सज्ज असलेल्या विमानातील कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.

Read in English