चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 

By नारायण बडगुजर | Published: May 12, 2024 10:23 PM2024-05-12T22:23:49+5:302024-05-12T22:24:05+5:30

चिखली परिसरात जाधववाडी येथे रविवारी (दि. १२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

Shooting at muddy professional tournament, one seriously injured | चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 

चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 

पिंपरी : व्यावसायिक स्पर्धेतून वाद झाले. यात एका व्यावसायिकाने गोळीबार केला. यामध्ये एक तरुण जखमी झाला. तर गोळीबार करणाऱ्या व्यावसायिकाच्या मित्राला देखील गोळी लागल्याने तो देखील गंभीर जखमी झाला. चिखली परिसरात जाधववाडी येथे रविवारी (दि. १२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

अजय सुनील फुले (१९, रा. मोहननगर) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. हर्षल बन्सी सोनावणे (रा. जाधववाडी, चिखली), श्याम चौधरी, कीर्ती भिऊलाल लिलारे अशी संशयितांची नावे आहेत. कीर्ती लिलारे हा यात गंभीर जखमी झाला. पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा गॅस शेगडी दुरुस्तीचे काम करतो. तसेच हर्षल सोनावणे याचा देखील गॅस शेगडी दुरुस्तीचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून अजय आणि हर्षल यांच्यात स्पर्धा होती. या स्पर्धेतून त्यांच्यात मागील काही महिन्यांपासून वाद सुरू होते. 

अजय रविवारी सायंकाळी त्याच्या दुकानात असताना हर्षल हा त्याच्या साथीदारांसह अजय याच्या दुकानात आला. त्यावेळी हर्षल याने अजय याच्यावर गोळीबार केला. यामध्ये पहिली गोळी अजय याच्या हाताला लागली. त्यामुळे अजय जखमी झाला. त्यानंतर पुन्हा दुसरी गोळी झाली. ती गोळी त्याचाच साथीदार कीर्ती लिलारे याला लागली. त्यात कीर्ती गंभीर जखमी झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हर्षल सोनावणे आणि श्याम चौधरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर त्यांचा जखमी साथीदार कीर्ती लिलारे हा रुग्णालयात दाखल आहे.  हर्षल व त्याचे साथीदार तसेच अजय फुले यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ही घटना वैयक्तिक वादातून झाली. त्यामुळे या घटनेचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही, असे पोलिस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.

गोळीबाराच्या घटनेने खळबळ
पुणे शहर, शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांच्या काही भागाचा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत समावेश आहे. या तीनही मतदारसंघांमध्ये सोमवारी (दि. १३) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. असे असतानाच मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली. गोळीबाराबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्याम चौधरी याला तर चिखली पोलिसांनी हर्षल सोनावणे याला ताब्यात घेतले.

Web Title: Shooting at muddy professional tournament, one seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.