Dombivli MIDC Blast डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 06:58 PM2024-05-23T18:58:37+5:302024-05-23T19:00:38+5:30

Dombivli MIDC blast जखमींमधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

Dombivli MIDC blast Death toll rises to 6 and 48 people are undergoing treatment | Dombivli MIDC Blast डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू

Dombivli MIDC Blast डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू

Dombiwali Blast ( Marathi News ) :एमआयडीसीमधील अमुदान नावाच्या केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामुळे आज दुपारच्या सुमारास डोंबिवली शहर हादरले. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या ६ जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट लिहीत या दुर्घटनेतील जखमींबाबत माहिती दिली आहे. "डोंबिवली दुर्घटनेत ६ जणांनी आपला जीव गमावला असून ४८ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रती माझ्या सहवेदना आहेत. या स्फोटात जखमी झालेल्यांवर एम्स आणि ग्लोबल हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहेत. विविध टीम्स आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दुर्घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत आहे," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

"धोकादायक कंपन्यांचे शहराबाहेर स्थलांतर करणार"

कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे. याबाबत माहिती देताना श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे की, "डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान नावाच्या रासायनिक कंपनीत आज दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या स्फोटातील जखमींच्या उपचारांची जबाबदारी घेण्यासोबतच स्फोटामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांना पंचनामा करून आठवडाभरात नुकसानभरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. डोंबिवली एमआयडीसीत वारंवार होणाऱ्या दुर्घटना आणि त्यामुळे रहिवासी भागाला निर्माण झालेला धोका लक्षात घेत डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांचे ए, बी, सी असे वर्गीकरण करून अतिधोकादायक कंपन्यांचे शहराबाहेर कायमस्वरूपी स्थलांतर केले जाईल," असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

शहरात खळबळ

डोंबिवली फेज २ मध्ये ही घटना घडली. स्फोटामुळे लागलेली आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या स्फोटामुळे २-३ किमी परिसरात मोठे हादरे बसले. यामुळे इमारतीच्या काचाही फुटल्या. त्यामुळे या स्फोटामुळे आणखी काही लोक जखमी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. डोंबिवलीत अशाप्रकारे स्फोट होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशाप्रकारे स्फोट झाले होते. मात्र त्यावर कुठलीही उपाययोजना केली नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. ज्याठिकाणी हा स्फोट झाला तिथून १ किमी अंतरावरील सोनारपाडा येथील एका बालरुग्णालयाच्या काचा फुटल्या. अक्षरश: काचांचा खच पडलेला दिसला. बंद पडलेल्या दुकानांचे शेटर तुटून आतमध्ये नुकसान झालं. रस्त्यावर पार्किंगला असणाऱ्या गाड्यांच्या काचा फुटल्या. इमारतीच्या घरांच्या काचा, दुकानांचे बोर्ड, चाळीतील पत्रे हेदेखील या स्फोटानं फुटलेले असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 


 

Web Title: Dombivli MIDC blast Death toll rises to 6 and 48 people are undergoing treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.