"आधी मला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न झाला, आता आई-वडिलांना टार्गेट करत आहेत"; केजरीवाल यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 05:34 PM2024-05-23T17:34:01+5:302024-05-23T17:39:57+5:30

Arvind Kejriwal Parents Inquiry by Delhi Police: एका नव्या विषयावरून अरविंद केजरीवाल यांची भाजपावर टीका

Arvind Kejriwal slams BJP PM Modi Delhi Police and said First they tried to destroy me now they are targeting parents"; Kejriwal alleged | "आधी मला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न झाला, आता आई-वडिलांना टार्गेट करत आहेत"; केजरीवाल यांचा आरोप

"आधी मला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न झाला, आता आई-वडिलांना टार्गेट करत आहेत"; केजरीवाल यांचा आरोप

Arvind Kejriwal Parents Inquiry by Delhi Police: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या जामिनावर जेलबाहेर आहेत. कथित मद्यघोटाळा प्रकरणी त्यांची तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. पण काही दिवसांपूर्वी त्यांना सशर्त जामिन मंजूर करण्यात आला. जेलमधून बाहेर आल्यानंतरही केजरीवाल सातत्याने भाजपावर निशाणा साधत आहेत. नुकतेच त्यांनी एका नव्या विषयावरून भाजपावर टीका केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केला की, दिल्लीपोलिसांना त्यांच्या वृद्ध आई-वडिलांची चौकशी का करायची आहे? अरविंद केजरीवाल म्हणाले की, यापूर्वी मला अटक करून मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र आता माझ्या आई-वडिलांना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. माझी आई खूप आजारी आहे, तिला अनेक आजार आहेत. माझे वडील ८५ वर्षांचे आहेत, त्यांना नीट ऐकूही येत नाही. अशा परिस्थितीत दिल्ली पोलिसांना त्याची चौकशी का करायची आहे हे समजण्यापलीकडचे आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, २१ मार्चला जेव्हा मला अटक करण्यात आली, त्याच दिवशी माझी आई रुग्णालयातून परतली होती. माझे पालक गुन्हेगार आहेत असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला मला त्रास द्यायचा असेल तर द्या. माझ्याशी भांडण करा, पण माझ्या आई-वडिलांना त्रास देणे थांबवा, देव सर्व काही पाहत आहे, असेही केजरीवालांनी केंद्र सरकारला उद्देशून खडसावले.

एक दिवसापूर्वी बातमी आली होती की दिल्ली पोलिसांना अरविंद केजरीवाल यांच्या पालकांची चौकशी करायची आहे. अरविंद केजरीवाल यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xनुसार, दिल्ली पोलिसांनी फोन करून त्यांच्या पालकांची चौकशी करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर आज पुन्हा अरविंद केजरीवाल यांनी X वर आपल्या पालकांसोबतचे फोटो शेअर केले आणि लिहिले की आम्ही दिल्ली पोलिसांची वाट पाहत आहोत. पोलिस येत आहेत की नाही हे मला माहीत नाही.

आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी या संपूर्ण प्रकरणाला भाजपाचे षडयंत्र म्हणत हल्लाबोल केला. आपचे खासदार संजय सिंह आणि दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी म्हणाले की, दिल्ली पोलिस भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. ज्या लोकांना नीट चालता येत नाही, त्यांचा छळ होत असल्याचे संजय सिंह म्हणाले. तसेच आतिशी म्हणाले की, सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर असल्याने भाजपा नवनवीन कारस्थान रचत आहेत.

Web Title: Arvind Kejriwal slams BJP PM Modi Delhi Police and said First they tried to destroy me now they are targeting parents"; Kejriwal alleged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.