८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 14:58 IST2025-08-14T14:44:39+5:302025-08-14T14:58:14+5:30

Vande Bharat Express Train: देशात आजच्या घडीला १५० वंदे भारत ट्रेन सुरू असून, सर्वांत जास्त अंतर पार करणारी वंदे भारत कोणती? महाराष्ट्रातून जाते ही वंदे भारत ट्रेन, जाणून घ्या...

Vande Bharat Express Train: अजनी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवत मार्गस्थ केले. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी प्रतीक्षित असलेली नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन अखेर सुरू झाली. या ट्रेनसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू ते बेळगाव आणि श्री माता वैष्णो देवी कटरा ते अमृतसर या दोन वंदे भारतचे लोकार्पणही केले.

आरामदायी आणि जलद प्रवासाची अनुभूती देणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची महाराष्ट्रातील विशेष रेल्वेंगाड्यांची संख्या नागपूर-पुणे या नव्या गाडीच्या समावेशाने २४ वर पोहोचली आहे. या तीन वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची भर पडल्यानंनतर देशात १५० वंदे भारत कार्यरत झाल्या आहेत. अद्यापही वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्याची क्रेझ देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

गतवर्षी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनने ३ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. यामुळे रेल्वेच्या तिजोरीत तब्बल ७५ हजार कोटींहून अधिकचे उत्पन्न जमा झाले. वंदे भारत ट्रेनकडे प्रवासी मोठ्या संख्येने आकर्षित होत असल्याकडे रेल्वे मंत्रालयाकडून लक्ष वेधले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अजनी (नागपूर)- पुणे वंदे भारत आणि अन्य राज्यातील दोन अशा एकूण तीन वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ झाला.

प्रवाशांचा प्रतिसाद पाहून काही मार्गांवरील ‘वंदे भारत’ ट्रेनच्या डब्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. यापैकी एक वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन भारतातील सर्वांत जास्त अंतर प्रवास करणारी वंदे भारत एक्सप्रेस आहे. ती कोणती ट्रेन आहे आणि ती किती अंतर प्रवास करते, याबाबत जाणून घेऊया...

नुकतीच सुरू झालेली नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सध्या भारतातील सर्वात लांब अंतराची वंदे भारत एक्स्प्रेस ठरली आहे. ही ट्रेन एकूण ८८१ किमी अंतर जाते. ही ट्रेन सुमारे १२ तासांत हा प्रवास पूर्ण करते. या ट्रेनला एकूण १० थांबे आहेत. नागपूर-पुणे मार्गावरील ही सर्वांत वेगवान ट्रेनही आहे. या ट्रेनचा सरासरी वेग ताशी ७३ किमी आहे.

ही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मध्य महाराष्ट्राला राज्याच्या पश्चिम भागाशी जोडण्यास मदत करेल. याचा प्रवासी, पर्यटक, लोकांना मोठा फायदा होणार आहे. अजनी नागपूर वंदे भारत एक्सप्रेस वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाईन मार्गे पुण्याला पोहचणार आहे.

लक्झरी आणि सेमी हायस्पीड अशी ही गाडी प्रारंभी ८ कोच घेऊनच धावणार आहे. ज्यात १ एक्झिक्युटिव्ह चेअर कार (ईसी) आणि ७ चेअर कार (सीसी) यांचा समावेश आहे. या ट्रेनचे चेअर कार भाडे २१४० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लास भाडे ३८१५ रुपये आहे.

ईसी कोचमध्ये ५२ प्रवासी, ५ सीसी कोचमध्ये प्रत्येकी ७८ प्रवासी आणि लोको पायलटच्या कोचला जोडलेल्या २ सीसी कोचमध्ये प्रत्येकी ४४ अशा प्रकारे या गाडीत एकूण ५३० प्रवासी बसू शकतात.

मूळ आरंभ आणि अखेरचा थांबा या आधारावर महाराष्ट्रात २२ (अप-डाऊन मार्गासह) वंदे भारत रेल्वे विविध स्थानकांची गरज पूर्ण करीत असल्याचे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे. यात आता नागपूर-पुणे वंदे भारत समाविष्ट होईल.

२०२४-२५ या वर्षात वंदे भारत एक्स्प्रेसमधून तीन कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. तर २०२५-२६ (जून २०२५ पर्यंत) वंदे भारतमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या ९३ लाख इतकी आहे. गतवर्षी १०२.०१ टक्के असणारी प्रवासी संख्या चालू वर्षात १०५.०३ टक्के आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसचे उत्पन्न करोना काळात म्हणजे २०२०-२१ मध्ये १५ हजार २४८ इतके होते. पुढील काळात त्यात उत्तरोत्तर वाढ झाली. २०२४-२५ या वर्षात रेल्वेला वंदे भारतमधून ७५ हजार ३६८ कोटींचे उत्पन्न मिळाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

नागपूर-सिंकदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस, हुबळी-पुणे, कोल्हापूर-पुणे, जालना-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बिलासपूर-नागपूर, मुंबई सेंट्रल-गांधीनगर, इंदूर-नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव, मुंबई सेंट्रल-अहमदाबाद या वंदे भारत ट्रेन कार्यरत आहेत.