ऐकावे ते नवलचं! ..म्हणून कोंबड्यांनाच जेलमध्ये बंद केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 12:19 PM2019-04-02T12:19:05+5:302019-04-02T12:25:27+5:30

कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. मात्र ही कारवाई जुगाऱ्यांसोबत कोंबड्यांनाही महागात पडली. पोलिसांनी 18 जुगाऱ्यांना अटक केली त्याचसोबत 6 कोंबड्यांनाही पोलीस स्टेशनमध्ये जेलची हवा खावी लागली. हरयाणातील नूंह जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काही जण कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले अन् 6 कोंबड्यांसह जुगाऱ्यांना अटक केली. त्याचसोबत 35 हजार रुपये रोख आणि तीन वाहने जप्त करण्यात आली

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुसैनी गावामध्ये अशाप्रकारे कोंबड्यांची झुंज सुरु असल्याचा फोन आला. यामध्ये फक्त गावातीलच नाही तर इतर राज्यांतूनही काही जण जुगार खेळण्यासाठी आल्याची माहिती दिली.

याच माहितीच्या आधारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आरोपींना पकडण्यासाठी गावात पोहचले. तेव्हा तिथे सुरु असलेला खेळ बंद करुन जुगार खेळणाऱ्यांना अटक केली.

6 कोंबडे कोणाच्या मालकीचे आहेत हे न कळाल्यामुळे पोलिसांनी कोंबड्यांनाही जेलमध्ये बंद केलं. बैतूल जिल्ह्यातील आठनेर पोलीस ठाणे क्षेत्रात जानेवारी 2018 मध्ये कोंबड्यांच्या झुंजीचा खेळ सुरु होता त्यावेळी पोलिसांनी आरोपींसह 2 कोंबड्यांना अटक केली होती.