Ashok Kharat Case : बायकोवर हात टाकला, रागाने अशोक खरातचे साम्राज्यच केले उद्ध्वस्त; जवळच्या व्यक्तीनेच केला गेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:49 IST2026-03-23T15:18:28+5:302026-03-23T15:49:42+5:30

Ashok Kharat Case : नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. खरात याच्या जवळच्या व्यक्तीनेच हे प्रकरण उघडकीस आणल्याचे समोर आले आहे.

Ashok Kharat Case : राज्यभर खळबळ उडविणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर चांगल्या संततीसाठी पूजा गरजेची असल्याचे सांगत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तर अन्य एका विवाहितेवर बलात्कारानंतर जबरदस्तीने गर्भपात केल्याचा दुसरा गुन्हा रविवारी नाशिक पोलिसांनी दाखल केला.

त्यामुळे विकृत खरातवर महिला अत्याचाराचे एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. खरातला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने गुन्ह्यांची कबुली दिल्याचे सांगण्यात येते. ईशान्येश्र्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह फार्महाऊस कर्मचारी आणि आठ जणांची एसआयटी पथकाकडून सखोल चौकशी करण्यात आली.

कथित 'दैवी शक्ती'च्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या या साम्राज्याचा पर्दाफाश झाला आहे. हे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यात मुख्य भूमिका एकेकाळी त्याच्याच जवळचा असणाऱ्या व्यक्तीने बजावली.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या कारनामांचा पर्दाफाश करणारा एकेकाळचा भक्त होता.

प्रसूती निर्विघ्न होण्यासाठी आणि बाळ सुसंस्कारी व्हावे, या उद्देशाने ही व्यक्ती २०२३ मध्ये आपल्या गरोदर पत्नीला घेऊन खरातकडे पोहोचली. पूजेचा बनाव करत खरातने त्या व्यक्तीला केबिनच्या बाहेर बसवले. खरातच्या शब्दांवर पूर्ण विश्वास असल्याने, पत्नीला आत सोडून ती व्यक्ती बाहेर थांबली.

केबिनची लाईट बंद करून खरातने त्या सात महिन्यांच्या गरोदर महिलेचा विनयभंग करत तिचे लैंगिक शोषण केले. या अघोरी प्रकारानंतर पीडितेने बाहेर येताच आपल्या पतीला घडलेली सारी घटना सांगितली. सुरुवातीला विश्वास ठेवायला पती तयार नव्हता, मात्र पत्नीने बाळाची शपथ घेताच विश्वास ठेवला. याच संतापातून त्या व्यक्तीने खरातच्या प्रत्येक हालचालीवर गुप्तपणे लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

खरातच्या वागण्यावर संशय बळावल्याने, त्या व्यक्तीने त्याच्या केबिनमध्ये छुपे कॅमेरे लावून प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवली. काही दिवसांतच खरातने महिलांचे केलेले लैंगिक शोषण कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले. हे सर्व पुरावे एका पेनड्राइव्हमध्ये जमा करून त्याने पोलिसांकडे धाव घेतली. पुराव्यांची दाहकता इतकी होती की, व्हिडीओ पाहताच पोलिसांनी तात्काळ कारवाईचे पाऊल उचलले. या एका धाडसी कृत्यामुळे खरातचे वर्षानुवर्षांचे साम्राज्य मातीत मिळाले.

अशोक खरातच्या या धक्कादायक प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून, विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. तपासादरम्यान अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे धक्कादायक धागेदोरे हाती लागत असून, येत्या काळात अधिक पीडित महिला तक्रारीसाठी पुढे येण्याची शक्यता आहे. खरातच्या या अघोरी कृत्यांनी समाजातील अंधश्रद्धा, राजकीय वरदहस्त आणि महिला सुरक्षा यांबाबतचे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे.

दरम्यान, नवी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात पोलिसांना खरातकडून काही माहिती आवश्यक असल्याने त्याचा ताबा घेण्यासाठी एसआयटी पथकाला पत्र दिले. त्यानंतर दुपारी खरातला क्राइम ब्रँचच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती.