सर्दी-डोकेदुखीच्या गोळ्या किराणा दुकानावर घेता का ? स्वतःच्या मनाने औषध घेत असाल तर, पूर्ण स्टोरी वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:33 IST2026-01-21T15:21:28+5:302026-01-21T15:33:53+5:30
पूर्वीच्या काळी मेडिकल स्टोअर्सची संख्या मर्यादित असल्याने औषध विक्रीचे एक वेगळेच जाळे पाहायला मिळायचे. ग्रामीण भागासह शहराच्या सीमावर्ती भागातही किराणा दुकाने किंवा टपऱ्यांवर सर्दी, खोकला आणि डोकेदुखीच्या गोळ्या सर्रास विकल्या जात. मात्र, मागील काही वर्षात अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कडक नियमांमुळे आणि वाढत्या आरोग्य सुविधांमुळे अशा प्रकारच्या अनधिकृत विक्रीला चाप बसला आहे.

प्रकृती बिघडली तर कुणाची जबाबदारी ? - किराणा दुकानातून घेतलेल्या औषधामुळे जर एखाद्या रुग्णाला रिअॅक्शन आले किंवा प्रकृती अधिक बिघडली, तर त्याची जबाबदारी दुकानदार स्वीकारत नाही. अशा विक्रीचा कोणताही अधिकृत 'बिलाचा' पुरावा नसल्याने ग्राहकाला दाद मागणे कठीण होते. स्वतःच्या मनाने औषध घेणे हे किडनी किंवा यकृतासाठी घातक ठरू शकते.

कारवाई आणि दंडाची काय तरतूद - विनापरवाना औषध विक्री करताना आढळल्यास कडक दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये ३ ते ५ वर्षापर्यंतचा कारावास आणि किमान १ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. अन्न व औषध प्रशासन वेळोवेळी अशा दुकानांवर छापे टाकून माल जप्त करण्याची कारवाई करते.

बहुतांश औषधे निकृष्ट दर्जाची - अशा अवैध ठिकाणी मिळणारी औषधे बऱ्याचदा साठवणुकीच्या योग्य पद्धती न पाळल्यामुळे खराब झालेली असतात. उष्णता किंवा ओलाव्यामुळे या गोळ्यांमधील रासायनिक घटक बदलतात. तसेच, काही वेळा एक्सपायरी डेट संपलेली औषधेही अशा दुकानांतून खपविली जाण्याची शक्यता जास्त असते.

ग्रामीणच नव्हे, शहरातही वाढले प्रकार - केवळ गावेच नाहीत, तर नागपूर शहराच्या टोकावर असलेल्या वस्त्यांमध्येही जनरल स्टोअर्समध्ये औषधे मिळायची. औषध विक्रेत्याचा परवाना नसतानाही 'डिस्प्रीन', 'अॅनासिन' किंवा साध्या सर्दीच्या गोळ्यांची पाकिटे फोडून सुटी विक्री केली जात होती. ग्राहकांच्या सोयीच्या नावाखाली हा जीवघेणा व्यापार सुरू होता.

पूर्वी किराणा दुकान, टपऱ्यांवर औषधांची विक्री - दोन-तीन दशकांपूर्वी दुर्गम भागात औषधांची उपलब्धता कमी होती. त्याचाच फायदा घेत काही किराणा दुकानदार किरकोळ आजारांवरील औषधे जवळ बाळगायचे. तापाची किंवा वेदनाशामक गोळी कोणत्याही डॉक्टरी सल्ल्याशिवाय किंवा फार्मसिस्टशिवाय विकली जायची, जी अत्यंत धोकादायक प्रथा होती.

कायद्यानुसार हा गंभीर गुन्हा - औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० नुसार, वैध परवान्याशिवाय कोणत्याही औषधांची विक्री करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. औषध विक्रीसाठी प्रशिक्षित फार्मसिस्टची उपस्थिती अनिवार्य असते, जी या दुकानांमध्ये नसते.

















