Maharashtra Political Crisis: “गृहमंत्रीपद मिळाले तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ”; ‘राज’पुत्राने स्पष्टच सांगितले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 09:59 AM2022-07-23T09:59:48+5:302022-07-23T10:05:34+5:30

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत अमित ठाकरेंनी सांगितली ‘मन की बात’

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या ऐतिहासिक बंडानंतर राज्याच्या राजकारणात अनेक प्रचंड मोठ्या घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले.

यानंतर भाजपने या घडामोडीत उडी घेत, शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, पराकोटीला पोहोचलेल्या राजकीय सत्तासंघर्षात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे पक्षाची मोठ बांधण्यासाठी दौऱ्यावर आहेत.

राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मनसेने भाजपला मतदान केल्यामुळे आता नव्या शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मनसेला खाते मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. इतकेच नव्हे तर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे सांगितले जात होते.

अमित ठाकरे मात्र राज्यात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर लोकांच्या भेटीगाठी घेण्यात व्यग्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) राज्यातील सत्तासंघर्षापासून बरीच दूर आहे. अध्यक्ष राज ठाकरे देखील शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत होते. तेही अजून फारसे काही बोलले नाहीत आणि सक्रिय देखील झालेले नाहीत. पण आपल्या पक्षाची बांधणी करण्याची धुरा अमित ठाकरेंनी घेतलेली दिसत आहे.

अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेच्या पुर्नबांधणीसाठी संपूर्ण राज्य पिंजून काढत आहेत. तळागळात जाऊन तरुणाईशी संवाद साधत आहेत. आजची तरुण पिढी आपली उद्याची मतदार आहे हे व्यवस्थित जोखून अमित ठाकरे कामाला लागलेत.

अमित ठाकरेंच्या महासंपर्क दौऱ्याला तरुणाई देखील चांगला प्रतिसाद देतेय. मीरा भाईंदर, वसई विरार आणि पालघर बोईसर येथे अमित ठाकरे यांनी दौरा केला. अमित ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे ठाणे पालघर जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांना बळ मिळणार असल्याचा विश्वास स्थानिक नेते व्यक्त करत आहे.

तुम्हाला राज ठाकरेंचा मनसे पक्ष वाढवायचा असेल तर सर्वात आधी स्वत:चा अहंकार बाजूला ठेवा आणि कामाला लागा. पक्षाला वाढवा, तसेच पूर्ण ताकदीने निवडणुका लढवा, असे आवाहन करत, गेल्या काही वर्षांत आपण अनेक पराभव बघितले आहेत. आता मात्र यापुढे आपल्याला फक्त विजय बघायचा आहे. आता राजकीय चढ-उतार नको, फक्त चढ हवा, असे अमित ठाकरे म्हणाले.

यातच अमित ठाकरे यांनी दादर ते अंबरनाथ असा लोकलने प्रवास केला. त्यानंतर अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अंबरनाथ पूर्वेतील रोटरी सभागृह येथे विद्यार्थी तसेच पदाधिकारी यांच्याशी बंददाराआड त्यांनी संवाद साधला.

यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मनसेला दोन मंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा सुरू असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारला. गृहमंत्री पद देणार असतील तर नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तेत सहभागी होऊ, पण ते देत नाहीत ना, असा मिश्किल टोला ठाकरे यांनी यावेळी लगावला.

यावेळी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेत, वर्षानुवर्षे असलेल्या त्या कायम असल्याची नाराजी व्यक्त केली. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे या भावांनी महाराष्ट्रात संवाद दौरे सुरू केले आहेत.

मनसेची पक्षसंघटना बळकट करण्यासाठी आणि अधिकाधिक तरुणांना पक्षासोबत जोडण्यासाठी अमित ठाकरे हे सध्या राज्यातील विविध भागांचा दौरा करत आहेत.

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मनविसे पाठबळ देणार असल्याची ग्वाही मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिली. अमित ठाकरे यांच्या सर्वच ठिकाणच्या दौऱ्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे.