फक्त सहा चित्रं सांगतील विधानसभेच्या 'महानिकाला'चा सारांश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 19:00 IST2019-10-25T18:50:41+5:302019-10-25T19:00:41+5:30

दिल्लीत नरेंद्र, मुंबईत देवेंद्र !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांचे म्होरके फोडून बत्ती लावली खरी, परंतु त्यापैकी काही फटाके फुसके निघाल्याने म्हणावा तसा 'आवाज' झालाच नाही. 'मी परत येणार' अशी साद घालत महाजनादेशासाठी जनतेच्या दरबारात गेलेल्या फडणवीसांना जनतेने पुन्हा संधी दिली आहे. मात्र ती देत असताना मतदारांनी विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढविल्याने भाजपच्या आतषबाजीवर निर्बंध आले. कदाचित सत्ताधाऱ्यांच्या कर्कश आवाजाने ध्वनिप्रदुषण होऊ नये म्हणून ही मतदारांनी ही काळजी घेतली असावी. पण दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र ही जोडी लोकांनी पसंत केली आहे. (चित्रः अमोल ठाकूर)

अंगावर गुलाल, मात्र अंगण कोरडे!
आदित्य ठाकरे यांच्या विजयाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आता विधानसभेत पाऊल ठेवणार आहे. मात्र हा विजय साजरा करताना 'मातोश्री'च्या अंगणात झालेल्या पराभवाने साऱ्या आनंदावर विरजण पडले आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात सेनेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांनी केलेला पराभव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागणारा आहे. (चित्रः अमोल ठाकूर)

पॉवरफुल बॉम्ब!
शरद पवार नावाच्या पॉलिटिकल बॉम्बला छेडणे किती महागात ठरू शकते, हे या निवडणुकीत दिसून आले. ७९ वर्षाच्या या तरुण तुर्काने स्वबळावर ५५ जागा जिंकून आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. वयाची आणि दुर्धर आजाराची तमा न बाळगता ईर्षेने पेटून उठलेल्या या नेत्याने महाराष्ट्र पिंजून काढत सत्ताधाऱ्यांना घाम फोडला आणि निवडणुकीचे निकाल आपल्या बाजूने फिरवले. पवारांना टार्गेट करणे भाजप नेत्यांच्या चांगलेच अंगलट आले. सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जिंकून स्वत:ला राजे म्हणविणाऱ्यांची चांगलीच उतरवली! (चित्रः अमोल ठाकूर)

थोडक्यात 'हाता'वर निभावले
कोणताही गाजावाजा न करताही कॉंग्रेस पक्षाला ४६ जागा मिळाल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत चार जागा अधिक मिळाल्या. काँग्रेसच्या या 'भरघोस' यशाचे श्रेय कोणाचे, यावर आता पक्षात मंथन होईलच. पण बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर झालेल्या या निवडणुकीत पक्षाने अपेक्षेहून अधिक यश मिळविले. थोडे अधिक कष्ट आणि योग्य नियोजन केले असते तर यापेक्षाही अधिक चमकदार कामगिरी करता आली असती. (चित्रः अमोल ठाकूर)

पुन्हा 'वंचित'च!
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मते घेऊन नऊ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विजय रोखला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत या वंचित आघाडीचा करिष्मा चाललेला दिसत नाही. एमआयएमसोबत काडीमोड घेत एकला चलो रे ची भूमिका घेणाऱ्या आंबेडकरांची घोर निराशा झाली आहे. महाआघाडीसोबत ते गेले असते तर कदाचित त्यांचे काही उमेदवार निवडूनही आले असते. एका अर्थी ते वंचितच राहिले आहेत.(चित्रः अमोल ठाकूर)

ना सत्तेत ना विरोधात!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेले, 'सक्षम विरोधी पक्षासाठी मते द्या' हे आवाहन मतदारांनी ऐकले खरे, परंतु ती मते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकली! मनसेचे इंजिन कल्याणच्या स्थानकातच थांबल्याने राज यांची घोर निराशा झाली. मनसेने तब्बल १०२ उमेदवार उभे केले होते. पैकी कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील हे एकमेव उमेदवार विजयी झाले. २०१४च्या निवडणुकीतही त्यांचा एकच आमदार होता. ती संख्या कायम ठेवण्यात त्यांना 'भरघोस' यश मिळाले. राज यांच्या सभांना झालेली गर्दी पाहाता त्यांना चांगले यश मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, राज यांचा शो पुन्हा फ्लॉप ठरला आहे. (चित्रः अमोल ठाकूर)

















