महायुतीचा फॉर्म्युला ठरला! मुंबईत शिंदेसेनेला 'इतक्या' जागा हव्यात, पुण्यात BJP-NCP वेगळं लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 09:18 IST2025-12-11T09:12:41+5:302025-12-11T09:18:14+5:30

नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे मात्र सत्ताधारी पक्षातील नेते आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहेत. महायुतीच्या समन्वय समितीची बैठक नागपूरात पार पडली. त्यात महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याचे समोर आले आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, नागपूरमध्ये भाजपा आणि शिंदेसेना एकत्रिक निवडणूक लढवणार आहे. मात्र पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी वेगळे लढतील अशी चिन्हे आहेत.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद समसमान आहे. त्यात कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि निवडणुकीतील बंडखोरी टाळावी यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढण्याची रणनीती आखली आहे.

दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही. परंतु भाजपा आणि शिंदेसेना एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू आहेत. महायुती म्हणूनच महापालिका निवडणूक लढवायची असा वरिष्ठ नेत्यांचा सूर आहे परंतु काही ठिकाणी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या त्यात महायुतीतील तिन्ही पक्षातील वाद ठळकपणे समोर येताना दिसले होते. मात्र महापालिकेत अशाप्रकारे वाद होऊ नयेत म्हणून महायुतीकडून एकत्र लढण्यावर भर दिला जात आहे.

प्रामुख्याने मुंबई, ठाणे, नाशिक याठिकाणी भाजपा आणि शिंदेसेनेत दिलजमाई झाल्याचे पाहायला मिळत आहे. या महापालिका निवडणुकीत महायुतीत लढले पाहिजे यावर नेत्यांचे एकमत झाले आहे. पण पुणे पिंपरी चिंचवड याठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी वेगळी लढताना दिसणार आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची ताकद सारखीच आहे. सध्या भाजपाची या महापालिकांवर सत्ता आहे परंतु याआधीच्या काळात राष्ट्रवादीचं या महापालिकांवर वर्चस्व होते. त्यात अजित पवारांचं विशेष लक्ष या २ महापालिकांवर आहे.

ज्या महापालिकेत महायुतीतील पक्ष वेगळे लढतील त्याठिकाणी निवडणूक निकालानंतर एकत्र येण्यावरही चर्चा झाली. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्ष सोयीनुसार राजकीय समीकरणे जुळवून विरोधकांना चितपट करण्याच्या मानसिकतेत आहेत.

नवी मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. याठिकाणी गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. परंतु नाईक आणि शिंदे यांच्यातील कटुतेमुळे या महापालिकेबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही. परंतु इथेही भाजपा-शिंदेसेना एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

विशेष म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक महायुतीसाठी महत्त्वाची आहे. याठिकाणी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेने महायुतीसमोर कडवं आव्हान उभं राहिले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची यावर भाजपा शिंदेसेना ठाम आहे. त्यात मुंबईत शिंदेसेनेकडून ९० ते १०० जागा भाजपाकडे मागितल्या आहेत अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
















